मागणी ७० टन; पुरवठा ५४ टन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 01:25 AM2021-04-17T01:25:56+5:302021-04-17T01:27:06+5:30
जिल्ह्यातील गंभीर कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन आणि ऑक्सिजन बेड मिळणे दुरपास्त झाले असून रेमडेसिविरसाठी खासगी रुग्णालयांनादेखील प्रतीक्षा करावी लागत आहे.
नाशिक : जिल्ह्यातील गंभीर कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन आणि ऑक्सिजन बेड मिळणे दुरपास्त झाले असून रेमडेसिविरसाठी खासगी रुग्णालयांनादेखील प्रतीक्षा करावी लागत आहे.
अनेक रुग्णांसाठी दिवस-दिवस प्रयत्न करूनही ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने ऑक्सिजनविना जीव गमावण्याची वेळ येऊ लागल्याने कठोरातील कठोर उपाययोजनांची नितांत आवश्यकता निर्माण झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय किंवा खासगी कोविड रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने बाधित नागरिकांच्या कुटुंबीयांची प्रचंड धावाधाव होत आहे. तसेच धावाधाव करूनही ऑक्सिजन बेड किंवा ऑक्सिजन उपलब्ध हाेत नाही. शहरातील काही खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन साठे संपुष्टात येण्याची वेळ आल्यानंतरही त्यांना ऑक्सिजन सिलिंडर्स उपलब्ध होऊ शकत नसल्याने बिकट अवस्था निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील रुग्णालयांना दिवसाला किमान ७० केएल ऑक्सिजनची गरज असून त्यापैकी ५२ ते ५५ केएल ऑक्सिजनचा पुरवठा कंत्राटदारांकडून होत आहे. मुरबाड, चाकणच्या प्रकल्पातून ऑक्सिजन मिळण्यासच विलंब हाेत असल्याने ऑक्सिजन मिळणे रुग्णालयांना प्रचंड जिकिरीचे झाले आहे.