बोगस डॉक्टरांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 10:26 PM2021-05-12T22:26:55+5:302021-05-13T00:34:40+5:30
जायखेडा : बागलाण तालुक्यातील जाड येथील बंगाली डॉक्टर बोगस असल्याचे प्रकरण समोर आले असले तरी त्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी अद्याप कोणीच पुढे आले नाही. दरम्यान, तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी मात्र वैद्यकीय संघटनेने केली आहे.

जाड या आदिवासी गावात एक कथित बोगस डॉक्टर दवाखाना चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक अलियाबाद येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेऊन जाड येथे दाखल झाले. त्यावेळी सरपंच व ग्रामसेवकांच्या उपस्थितीत दवाखाना असलेल्या खोलीचे कुलूप तोडण्यात आले. त्याठिकाणी औषधांचा मोठा साठा आढळून आला. मात्र, गावकऱ्यांनी विरोध व दगडफेक केल्याने पोलीस पथकास माघारी फिरावे लागले. यासंदर्भात जबाबदार असलेले अधिकारीही याप्रकरणी गंभीर नसल्याने दुसऱ्या दिवशीही कुठलेच ठोस पाऊल उचलण्यात आले नाही. तथापि, तालुक्यात बोगस डॉक्टरांचे प्रमाण अधिक असल्याने त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी वैद्यकीय संघटनेने केली आहे.