देवळालीतील गावगुंडांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:07 AM2017-10-26T00:07:55+5:302017-10-26T00:08:02+5:30
देवळाली गावातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाºया नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच टवाळखोर व गावगुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी कडक उपाययोजना करावी, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांनी केली.
नाशिकरोड : देवळाली गावातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाºया नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच टवाळखोर व गावगुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी कडक उपाययोजना करावी, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांनी केली. देवळालीगाव येथे चार दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्व स्तरामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर देवळालीगाव श्री दक्षिणमुखी मारुती मंदिर प्रांगणात मंगळवारी सायंकाळी पोलीस प्रशासन व ग्रामस्थांची संयुक्त बैठक पार पडली. बैठकीमध्ये फाशीची शिक्षा देण्यात यावी, याकरिता पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने हा गुन्हा हाताळावा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. या प्रकारचे गैरकृत्य करण्याचा विचारही कोणाच्या मनात येऊ नये अशी कारवाई करावी, अशा प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केल्या. तसेच देवळाली भागातील विस्कटलेली कायदा-सुव्यवस्थेची घडी बसविण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी लक्ष घालावे. मोटारसायकल्स राईड्स करणाºयांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस गस्त वाढवावी, सुलभ व मनपा शौचालयात स्वच्छतेसाठी महिला कामगारांची नियुक्ती करावी, सोमवार आठवडे बाजारात लूटमार व दादागिरी करणाºयांचा बंदोबस्त करावा, मद्यपींचा उपद्रव थांबविण्यासाठी कडक कायदेशीर कारवाई करावी, अशा विविध मागण्या व भावना बैठकीत ग्रामस्थ, महिलांनी बोलून दाखविल्या. बैठकीला दुय्यम पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, नगरसेवक सूर्यकांत लवटे, सत्यभामा गाडेकर, सुनीता कोठुळे, सरोज आहिरे, माजी महापौर नयना वालझाडे, श्याम खोले, अॅड. अलका थोरात, उपनिरीक्षक संध्या तेली आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी तक्रारीकरिता व विशेष करून महिलांना तक्रारीसाठी असलेले विविध मोबाइल क्रमांक, निर्भया व्हॅन आदींबाबत माहिती दिली. गोपनीय पद्धतीने चौकशी करून त्यांचा बंदोबस्त पोलीस करतील, असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला. आपल्या घरातील मुले-मुली कुठे जातात, कोणासोबत राहतात, काय करतात, मोबाइलमध्ये काय करतात याची खबरदारी पालकांनी घ्यावी, असे आवाहन केले.