दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी
By admin | Published: May 30, 2016 10:54 PM2016-05-30T22:54:52+5:302016-05-30T23:15:37+5:30
दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी
दिंडोरी : तालुक्यातील ओझे येथील महिलेच्या संततीनियमन शस्त्रक्रिये दरम्यान झालेल्या मृत्यूची निष्पक्ष व सखोल चौकशी होऊन दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी मयत महिलेचे पती सुनील धुळे यांनी केली असून, सदर प्रकरणी त्यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. दरम्यान, मयत विवाहितेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एका पंधरा दिवसाच्या चिमुरडीसह तीन बालके आईविना पोरकी झाली आहेत .
दि. २५ मे रोजी संततीनियमन शस्त्रक्रियेसाठी ओझे येथील सोनाली सुनील धुळे हिला निगडोळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. गुरुवार, दि. २६ रोजी दुपारी शस्त्रक्रिया करताना गर्भपेशीच्या नसेऐवजी दुसरीच नस कापली गेल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचा आरोप तिच्या पतीने पोलिसांना दिलेल्या लेखी अर्जाद्वारे केला आहे. यावेळी डॉक्टरांनी तिला रक्ताची गाठ असल्याने नाशिकला न्यावे लागणार असल्याचे सांगितले. यानंतर तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले. तेथे तिची सोनोग्राफी केली असता डॉक्टरांनी गाठ नसल्याचे सांगत शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितल्यावर शस्त्रक्रि या केल्याचे तिच्या नातेवाइकांनी सांगितले. यावेळी तिला रक्त देण्यात आले. मात्र तिची तब्बेत अजून ढासळत तिचा शनिवार, दि. २८ रोजी सकाळी मृत्यू झाला. यानंतर तिच्या नातेवाइकांनी तिच्या मृत्यूला डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करत संबंधित डॉक्टरवर कारवाईची मागणी करणारा तक्रार अर्ज दिंडोरी पोलीस ठाण्यात दिला होता. रविवारी सकाळी पुन्हा दिंडोरी पोलीस ठाण्यात सुनील धुळे यांनी सदर शस्त्रक्रिया करणारे डॉ. निकम तसेच जिल्हा रुग्णालयातील डॉ. लहाडे यांच्यासह निगडोळ प्राथमिक आरोग्य केंद्राचा निष्काळजीपणा सोनालीच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे सांगत सदर प्रकाराची चौकशी करून त्यांचेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.