जावेद अख्तर यांच्यावर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 04:29 PM2019-05-06T16:29:12+5:302019-05-06T16:29:23+5:30
नाराजीचा सूर : राजपूत करणी सेनेचे निवेदन
येवला : सुप्रसिद्ध गीतकार व पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी बुरख्यावर बंदी घालण्याबरोबरच राजस्थानमधील घुंगटप्रथेवरही बंदी घालावी, अशी मागणी केल्याने या विधानावर येवल्यातील श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना, भाजप व सेनेच्या वतीने आक्षेप घेत नाराजी व्यक्त करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याला धार्मिक वळण देत जावेद अख्तर यांनी देशाचा आणि धर्माचा अपमान केला आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी येवला शहर पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी स्वीकारले. आजपर्यंत हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये घुंगट परिधान करणाऱ्या महिलांनी कोणत्याही देशिवरोधी कारवाईमध्ये, कटकारस्थानात भाग घेतल्याचे दाखवून द्यावे आणि मग असेविधान करावे. हिंदू धर्मातील घुंगट परिधान करणा-या स्त्रिया वेळोवेळी आपल्या ओळखीसाठी, कायदेशीर कारवाईसाठी घुंगट बाजूला ठेवून जगास सामोरे जात असतात, असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश कोषाध्यक्ष धिरजसिंग परदेशी, नाशिक जिल्हा अध्यक्ष झुंजारराव देशमुख, तालुका अध्यक्ष किरणसिंग परदेशी, उपतालुका अध्यक्ष शुक्लेश्वर जाधव, युवा ग्रामीण महामंत्री कुणाल परदेशी, छावा उत्तर महाराष्ट्र प्रमुख संजय सोमासे, भाजप शहराध्यक्ष आनंद शिंदे, उपाध्यक्ष दिनेश परदेशी, शांताराम परदेशी, मयुर राठोड, विनायक राठोड, उमेश राठोड या सह कार्यकर्ते उपस्थित होते.