हिरावाडीत गोठेधारकांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:48 AM2019-06-04T00:48:12+5:302019-06-04T00:48:17+5:30
हिरावाडी परिसरातील कमलनगर तसेच महापालिका क्रीडा संकुल या भागात अनेक काठेवाडी नागरिकांनी अनधिकृतपणे म्हशीचे गोठे थाटले असून यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
पंचवटी : हिरावाडी परिसरातील कमलनगर तसेच महापालिका क्रीडा संकुल या भागात अनेक काठेवाडी नागरिकांनी अनधिकृतपणे म्हशीचे गोठे थाटले असून यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे गोठे थाटताना महापालिका प्रशासनाची कुठलीही परवानगी घेतलेली नसून, महापालिका याबाबत अनभिज्ञ असल्याचे बोलले जात आहे.
हिरावाडी परिसरातच एका ठिकाणी काठेवाडी नागरिकांनी महापालिकेच्या जागेतच अतिक्रमण करून म्हशीचे गोठे थाटले असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे. हिरावाडी भागात असलेले जनावरांचे गोठे तातडीने हलविण्यात यावेत यासाठी परिसरातील नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन दिले आहेत.
हिरावाडी भागात अनधिकृत गोठ्यांमुळे परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले असल्याने महापालिका कारवाई करणार का, असा सवाल हिरावाडी परिसरात राहणाºया नागरिकांनी केला आहे.
डासांचा वाढता प्रादुर्भाव
काही गोठेधारक मृत झालेली जनावरे पाट किनारी आणून फेकतात तसेच गोठ्यातील गाई, म्हशींचे मलमूत्र परिसरातच टाकत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्यामुळे डासांचा प्रादुर्भावदेखील वाढला असून, रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गोठे थाटतांना महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक असले तरी काही गोठेधारकांनी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
थेट महापालिकेच्या भूखंडावर अतिक्रमण केलेले असतानादेखील महापालिका प्रशासन गप्प का, असा सवाल परिसरात अनेक राहणाºया नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे गोठ्यांसाठी लागणारे पाणीदेखील चोरून वापरले जात असल्याचे समजते. परिसरातील काठेवाडी गोठेधारक गाई, म्हशी चरण्यासाठी मोकळे सोडून देतात.