नाशिकसाठी कृषी विद्यापीठाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:14 AM2021-05-22T04:14:08+5:302021-05-22T04:14:08+5:30
नाशिक : विभागातील नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव या चार जिल्हयांसाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठाची आवश्यकता असून, राज्य सरकारने नाशिकमध्ये अशाप्रकारचे ...
नाशिक : विभागातील नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव या चार जिल्हयांसाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठाची आवश्यकता असून, राज्य सरकारने नाशिकमध्ये अशाप्रकारचे कृषी विद्यापीठ उभारण्याची मागणी होत आहे. तसेच नाशिक कृषी क्षेत्रात अग्रेसर जिल्हा असून, येथे कृषी तंत्रज्ञान आणि कौशल्य विकसित होण्यासाठी कृषी विदयापीठ होणे आवश्यक असल्याचा सूर शेती क्षेत्रातील अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.
विद्युत रोहित्र वेलीच्या विळख्यात
नाशिक : इंदिरानगर परिसरातील विद्युत रोहित्रांना वेलींनी वेढले असून, या वेली उन्हामुळे वाळल्या आहेत. या वाळलेल्या वेलींना शॉर्टसर्किटमुळे ठिणगी पडून आग लागण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनपेक्षित घटना टाळण्यासाठी विद्युत रोहित्रांच्या परिसरातील वाळलेले गवत आणि वेली हटविण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
---
रस्त्यावर कचरा फेकण्याचे प्रकार
नाशिक : इंदिरानगर भागातील जगन्नाथ चौकातून शरयू नगरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर परिसरातील व्यावसायिक व किरकोळ विक्रेत्यांकडून कचरा फेकण्याचे प्रकार सुरू आहेत. यात शिळे अन्न व भाजीपाल्यासारख्या नाशवंत पदार्थांचा समावेश असल्याने या भागात दुर्गंधी पसरली असून, परिसरातील नागरिकांकडून हा कचरा हटविण्याची मागणी होत आहे.
--
नासर्डी नदीला प्रदूषणाचा विळखा
नाशिक : नासर्डी नदीत प्लास्टिकसह विविध प्रकारचा कचरा फेकला जात असल्याने या नदीला प्रदूषणाने विळखा घातला आहे. त्याचप्रकारे ठिकठिकाणी रहिवासी वसाहतींमधून निघणारे पाणी विनाप्रक्रिया नदीपात्रात सोडले जात असल्यानेही नदीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नासार्डी नदी परिसरात यामुळे दुर्गंधी पसरत आहे.
---
शहरात दुकाने बंद, पानटपऱ्या सुरू
नाशिक : इंदिरानगर भागात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठ व दुकाने बंद असली तरी परिसरातील पानटपऱ्या मात्र सुरूच आहेत. अनेक टपऱ्यांवर अवैधरित्या गुटखा अथवा सुगंधित तंबाखूची विक्री सुरूच आहे. काही पानटपरीधारक टपरीजवळ थांबून येणाऱ्या ग्राहकांना तंबाखू व अन्य अमली पदार्थांची विक्री करत आहेत.
--
भाजी विक्रेत्यांकडून नियमांचे उल्लंघन
नाशिक : इंदिरानगर भागात भाजी विक्रेत्यांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. रथचक्र परिसर व अश्वमेध परिसरात भाजी विक्रेत्यांकडून मास्क आणि सॅनिटायझरसारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात नसल्याने, कोरोनाचा फैलाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
---
कर्ज हप्ते स्थगित करण्याची मागणी
नाशिक : राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू केल्याने, अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा व्यावसायिकांकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा नागरिकांना गृह कर्जासह विविध प्रकारच्या कर्जाच्या हप्त्याची परतफेड करण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, राज्य सरकारने बँकांना सूचना करून कर्जाचे एप्रिल व मे महिन्याचे हप्ते स्थगित करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
--