हरणबारीचे आवर्तन सोडण्याची मागणी
By admin | Published: April 23, 2017 01:17 AM2017-04-23T01:17:51+5:302017-04-23T01:18:06+5:30
नामपूर : बागलाणसह मालेगाव तालुक्यातील गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाण्याची समस्या सोडविण्यासाठी हरणबारी धरणातील पिण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी करण्यात येत आहे.
नामपूर : बागलाणसह मालेगाव तालुक्यातील मोसम नदीकाठावरील गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाण्याची समस्या सोडविण्यासाठी हरणबारी धरणातील उन्हाळी हंगामातील पिण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
हरणबारी धरणापासून ते मालेगावपर्यंत किमान शंभरपेक्षा जास्त गावे मोसम नदीकाठावर वसलेले आहेत. या सर्वच गावांचा पाणीपुरवठा हा या धरणावर आधरित आहे. आज या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, नागरिकांसह मुक्या जनावरांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. मोसम खोऱ्यातील मोठे गाव नामपूरलाही दहा दहा दिवसा पाणीपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. मोसम नदीकाठावरील अनेक गावांत टॅँकरमार्फत पाणी पुरवठा सुरू असून, खासगी पाणी विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. आदिवासी व गरीब जनतेला हंडाभर पाण्यासाठी मैलभर पायपीट करावी लागत आहे. पंचायत समिती प्रशासनसुद्धा पाणीपुरवठा करण्यास हतबल झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने हरणबारी धरणातून आवर्तन सोडण्याचे आदेश दिले, तर उन्हाळी हंगामातील पाणीटंचाई दूर होऊन सर्वसामान्यांचे हाल कमी होणार आहेत. संबंधित विभागाने तातडीने दाखल घेऊन हरणबारी धरणाचे आवर्तन त्वरित सोडावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती यतिन पगार यांच्यासह नामपूरच्या सरपंच सोनाली निकम, बाजीराव सावंत, दगाजी बच्छाव, सुनील अलई, शशिकांत कोर यांनी केली आहे. (वार्ताहर)