देवळा तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 01:08 PM2018-10-17T13:08:15+5:302018-10-17T13:08:30+5:30
खर्डे : देवळा तालुका दुष्काळी जाहीर करण्यात यावा ,व गिरणा नदीचे आवर्तन पूर्वीसारखे पूर्ववत करण्यात यावे ,या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तहसीलदार दत्ता शेजूळ यांना देण्यात आले .
खर्डे : देवळा तालुका दुष्काळी जाहीर करण्यात यावा ,व गिरणा नदीचे आवर्तन पूर्वीसारखे पूर्ववत करण्यात यावे ,या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तहसीलदार दत्ता शेजूळ यांना देण्यात आले . निवेदनात म्हटले आहे की, चालू वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून , जिल्ह्यातील देवळा तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद तहसील दप्तरी आहे. आजही काही गावांना पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर असून ,पूर्व भागात टँकर द्वारे पाणी पुरवठा सुरु आहे . जनावरांच्या चार्याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे . नोव्हेंबर ते जून या आठ महिने तालुक्यातील जनतेला दुष्काळाला सामोरे जावे लागणार असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले असून ,शासनाने संपूर्ण वीजिबल आणि कर्जमाफी देऊन मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा तसेच शालेय विदयार्थ्यांची फी माफ करण्यात यावी . तसेच जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे . गिरणा नदीचे आवर्तन पूर्वी ४० ते ४५ दिवसांचे होते . ते आता ६० दिवसांचे केले आहे . देवळा व सटाणा शहरांना गिरणा नदीवरून पाणी पुरवठा करण्यात येतो . गिरणा नदी काठावरील सर्व गावांच्या पाणी पुरवठा योजना गिरणा नदीवर असल्याने याचे रोटेशन पूर्वीसारखे पूर्ववत करण्यात यावे , असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पंडितराव निकम ,जिल्हा परिषद यशवंत शिरसाठ , पंचायत समिती सभापती कुसुमबाई अहिरे ,माजी सभापती उषा बच्छाव ,बाजार समिती माजी सभापती योगेश अहेर , संचालक जगदीश पवार ,राघो अहेर , गटनेते जितेंद्र अहेर , खुंटेवाडीचे सरपंच भाऊसाहेब पगार ,अतुल अहेर ,अमोल अहेर , संतोष उर्फ गोटू शिंदे , महेंद्र अहेर , चिंतामण अहेर , सचिन सूर्यवंशी ,रजत अहेर ,निखिल अहेर ,मुरलीधर अहेर ,सतीश कोठावदे , बाबाजी निकम ,शशी चितळे , सतीश सूर्यवंशीं ,डॉ कृष्णा आहेर , समाधान आहेर आदींच्या सहया आहेत .