बैलजोडीचे अनुदान देण्यासाठी केली पैशाची मागणी
By admin | Published: December 16, 2014 01:57 AM2014-12-16T01:57:13+5:302014-12-16T01:57:45+5:30
धक्कादायक : पंचायत समितीतील प्रकार : कृषी अधिकारी गोत्यात
नाशिाक : तालुका पंचायत समितीतील विशेष घटक योजनेतर्गंत आदिवासी शेतकऱ्यांना बैलजोडी व बैलगाडीचे अनुदान वाटप करण्यासाठी चक्क पैशाची मागणी करण्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी कृषी अधिकारी नवलसिंग पवार गोत्यात आले आहेत. गंगाम्हाळुंगी येथील सात शेतकऱ्यांनी गटविकास अधिकारी रवींद्रसिंह परदेशी यांच्याकडे तक्रार केली असून परदेशी यांनी नवलसिंग पवार यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव तयार केला असून तो मंगळवारी (दि.१६) मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांना सादर करण्यात असल्याचे समजते. यापूर्वीही नवलसिंग पवार यांना बागलाण तालुक्यातील वादग्रस्त प्रकरणामुळे निलंबनाच्या कार्यवाहीला सामोरे जावे लागल्याची चर्चा आहे. काल दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गंगाम्हाळुंगी येथील आदिवासी शेतकरी सुका फसाळे, श्रावण फसाळे, सिताराम डगळे, सोमनाथ फसाळे, धोंडूु पुंजा फसाळे, मनोहर फसाळे, वामन फसाळे आदी शेतकऱ्यांसह कैलास मंडलिक यांनी पंचायत समितीच्या कृषी विभागात जाऊन विशेष घटक योजनेचे कृषी अधिकारी नवलसिंग पवार यांची भेट घेतली. पवार यांनी या शेतकऱ्यांकडून विशेष घटक योजनेतून बैलगाडी व बैलजोडी घेण्यासाठी देण्यात येणाऱ्या ४० हजार रूपयांच्या अनुदानापैकी प्रत्येकी नऊ हजाराची मागणी केली.