मुखेड फाट्यावर सर्कलची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 06:09 PM2020-12-15T18:09:53+5:302020-12-15T18:10:12+5:30
अपघातात वाढ : आदिवासी उलगुलान सेनेचे निवेदन
पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव शहरातून जाणाऱ्या शिर्डी- सुरत महामार्गाचे गेल्या दोन तीन वर्षांपासून कासव गतिने काम सुरू असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सदर काम जलद गतीने पूर्ण करून त्या ठिकाणी सर्कल उभारावे, अशी मागणीआदिवासी उलगुलान सेनेने बांधकाम विभाग नाशिकचे अभियंता पाटील,पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे व ग्रामपंचायतचे गणेश बनकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, आदिवासी उलगुलान सेनेतर्फे अपघाताचे गांभीर्य लक्षात आणून देत मुखेड फाट्यावर सर्कल बांधून रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी ठेकेदारा व संबंधित विभागाला केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने अपघात होऊन निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. लवकरात लवकर सदर काम पूर्ण करून दिलासा द्यावा अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा आदिवासी उलगुलान सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर फसाळे यांनी दिला आहे. यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रेय झनकर, भागवत घागरे, ग्रामपंचायत माजी सदस्य विष्णू गांगुर्डे, शाखा अध्यक्ष रमेश गवळी संदीप जाधव भाऊसाहेब पीठे, जितू वाघ ,मनोज पवार,शाम कोकाटे,मनोज कराटे, आकाश मोरे,आदी उपस्थित होते.