गोणीतील कांदा लिलाव बंद करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 10:18 PM2020-04-24T22:18:19+5:302020-04-24T23:46:07+5:30
लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बारदाण गोणीतील कांदा लिलाव बंद करून खुल्या पद्धतीने लिलाव सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बारदाण गोणीतील कांदा लिलाव बंद करून खुल्या पद्धतीने लिलाव सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. यासंबंधी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या एक महिन्यापासून मजुरांअभावी कांदा गोणी बारदाण लिलाव सुरू असून, शेजारी विंंचूर उपआवारावर मात्र खुले कांदा लिलाव सुरू आहेत. शेतकरी वर्गाला नाहक कांदा गोणी भरावी लागत आहे तसेच विनाकारण गोणीचा खर्च करावा लागत आहे. लिलावानंतर व्यापारी मालट्रक अगर कंटेनर येईपर्यंत थांबवून ठेवतात व हमाल निघून गेले तर कांदा उत्पादकांनाच या गोण्या खाली कराव्या लागतात. लासलगावी कांदा गोणी लिलाव सुरू असल्याने कांदा आवकही घटली आहे. लासलगाव बाजार समितीत सर्वोच्च आवक होत असताना केवळ कांदा गोणीमुळे आवक कमी झाली आहे. त्याचा परिणाम लासलगावचे मजूर व व्यवसायावर झालेला आहे. त्यामुळे त्वरित खुला कांदा लिलाव सुरू करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन लासलगाव येथील कॉँग्रेस नेते गुणवंत होळकर, भारतीय जनता पक्षाचे संतोष पलोड, राजेंद्र चाफेकर व रवींद्र होळकर यांच्यासह मान्यवरांनी सभापती सुवर्णा जगताप व सचिव नरेंद्र वाढवणे यांना सादर केले.