विद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्याची मागणी
By Admin | Published: June 19, 2017 12:49 AM2017-06-19T00:49:37+5:302017-06-19T00:58:42+5:30
विद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
लोहोणेर : देवळा तालुक्यातील खुंटेवाडी येथील ग्रामशिक्षण समितीच्या श्रीराम माध्यमिक विद्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम त्वरित करण्यात यावे तसेच विद्यालयाची गुणवत्ता सुधारण्यात येऊन सर्व सोयींयुक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा आशयाचे निवेदन खुंटेवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष प्रशांत देवरे यांना देण्यात आले.
खुंटेवाडी येथे १९७९-८० पासून उमराणा येथील ग्रामशिक्षण समितीचे श्रीराम माध्यमिक विद्यालय कार्यरत आहे. संस्थेचे संस्थापक कर्मवीर ग्यानदेवदादा देवरे व गावातील ग्रामस्थांनी श्रमदानातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत श्रीराम विद्यालयाची मुहूर्तमेढ त्यावेळी रोवली आहे. जिल्ह्यातील मान्यवर अशा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेबरोबरच देवळा एज्युकेशन सोसायटीने खुंटेवाडी येथे माध्यमिक विद्यालय सुरु करण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र ग्रामस्थांनी ग्रामशिक्षण समितीला त्यावेळी प्राधान्य दिले होते. गेल्या २५ वर्षांपासून ग्रामस्थांनी विद्यालयाच्या गुणवत्ता वाढीसाठी व भौतिक सुविधांच्या उपलब्धतेबाबत अनेकवेळा लेखी, तोंडी मागणी केलेली आहे परंतु आतापर्यंत ग्रामस्थांच्या पदरी घोर निराशाच आली आहे. विद्यालयाच्या गुणवत्ता वाढीसाठी संस्थाचालक व ग्रामस्थांमध्ये समायोजन होणे गरजेचे असून सध्यस्थितीत विद्यालयाची स्वतंत्र व सुसज्य इमारतीचे बांधकाम होणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना शालेय वातावरण पोषक उपल्बध व्हावे यासाठी विद्यालयाची स्वतंत्र, सुसज्य व सर्व सोयींयुक्त अशी इमारत होणे अपेक्षित आहे. यासाठी संस्थेच्या वतीने तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. चांदवड -देवळाचे आमदार डॉ. राहुल अहेर यांनी खुंटेवाडी गाव दत्तक घेतले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावाची वाटचाल आदर्श गावाकडे चालू आहे. आदर्श गावाला साजेशे असे माध्यमिक विद्यालय गावात कार्यरत असावे, अशी सर्व ग्रामस्थांची रास्त मागणी आहे.