भाडेतत्त्वावरील वसतिगृहे सुरू ठेवण्याची मागणी
By admin | Published: April 7, 2017 11:08 PM2017-04-07T23:08:20+5:302017-04-07T23:08:39+5:30
सिन्नर : आदिवासी विद्यार्थ्यांचे भाडेतत्त्वावरील वसतिगृहे सुरू ठेवण्याची मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने नायब तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिन्नर : पंडित दीनदयाळ योजनेस स्थगिती देऊन आदिवासी विद्यार्थ्यांचे भाडेतत्त्वावरील वसतिगृहे सुरू ठेवण्याची मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने नायब तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पुणे, उल्हासनगर येथील आदिवासी विद्यार्थ्यांचे भाडेतत्त्वावरील वसतिगृहे बंद करण्याचे आदेश प्रकल्प कार्यालयातून गृहपालांमार्फत देण्यात आले असून, विद्यार्थ्यांना
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेत समाविष्ट करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असल्याचे निवेदन म्हटले आहे.
आदिवासी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या कोणत्याही योजनेत सातत्य नाही. निर्वाह भत्ता वेळेत मिळत नाही, शिष्यवृत्ती वेबसाइट शैक्षणिक वर्ष संपले तरी चालू होत नाही यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांची फसवणूक होण्याची शक्यता जास्त असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
दीनदयाळ योजनेची रक्कम खात्यावर वेळेत जमा न झाल्यास आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण अर्ध्यावर सोडून गावी परतावे लागण्याची भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
परीक्षेच्या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हातातील पुस्तके बाजूला ठेवून वसतिगृहे वाचवण्यासाठी आंदोलन करावे लागणे दुर्दैवी असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे तालुकाध्यक्ष देवराम खेताडे, महिला प्रतिनिधी यमुनाबाई भांगरे, कार्याध्यक्ष भगवान तळपाडे, शहराध्यक्ष रोहित मुठे, विजय मुठे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)