सुकामेव्याच्या मागणीत झाली वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:02 AM2019-11-23T00:02:51+5:302019-11-23T00:03:37+5:30
शहरात थंडीचे आगमन होत असतानाच सुकामेव्याच्या पदार्थांनी बाजारपेठ सजण्यास सुरु वात झाली आहे. थंडीचा पारा १४ अंशांपर्यंत घसरल्यामुळे बाजारात नागरिकांकडूनही सुकामेव्याची मागणी केली जात आहे.
नाशिक : शहरात थंडीचे आगमन होत असतानाच सुकामेव्याच्या पदार्थांनी बाजारपेठ सजण्यास सुरु वात झाली आहे. थंडीचा पारा १४ अंशांपर्यंत घसरल्यामुळे बाजारात नागरिकांकडूनही सुकामेव्याची मागणी केली जात आहे. यात खारीकचे दर ३७० कलम हटविल्यामुळे बाजारात खारीक २५० ते ३०० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच शहरातील तापमान घसरण्यास सुरुवात झाली होती. मात्र गेल्या एक दोन दिवसांपासून तापमान सतत घसरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरात पहाटेच्या सुमारास फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य संवर्धनासाठी उबदार कपड्यांबरोबरच सुकामेवा खरेदी करण्यासही प्रारंभ केला आहे. खास करून डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत सुकामेव्यास नाशिकमध्ये मोठी मागणी असते. सुकामेव्याच्या खरेदीला विशेषत: डिसेंबरमध्ये प्रतिसाद मिळतो. परंतु, यंदा डिसेंबरमध्ये जाणवणाºया थंडीचे आगमन नोव्हेंबर महिन्यातच जाणवू लागले आहे. सुकामेव्याला आरोग्यसंवर्धासाठी विशेष महत्त्व आहे. त्यामुळे बाजारात सुकामेव्याची मागणी वाढू लागली आहे.
इतर देशांतून करावी लागते खारीक आयात
केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी काश्मीरमध्ये लावण्यात आलेला ३७० कलम हटविल्यामुळे पाकिस्तानमधून भारतात काही गोष्टींची निर्यात बंद करण्यात आली होती. खारीक ही मुख्यत: पाकिस्तानमधून भारतात येत असते. मात्र सध्या पाकिस्तानची खारीक भारतात येणे बंद झाल्याने इतर देशांतून खारीक आयात करावी लागत आहे. त्यामुळे खारीकचे दर मागील वर्षीच्या तुलनेत तिप्पटीने वाढली आहे.
असे आहेत दर (प्रतिकिलो)
खारीक : २५० ते ३००
अक्रोड : ६५० ते ७५०
बदाम : ७५० ते ९००
काजू : ८०० ते ११००
काळा मनुका : ४०० ते ६००
साधा मनुका : १८० ते २४०
खारे पिस्ता : १००० ते १४००
अंजीर : ९०० ते १३००
डिंक : १८० ते २००
खोबरे : २०० ते २२०
साधे खजूर : १२० ते १५०
काळे खजूर : ३०० ते ३४०
थंडीची चाहुल लागल्यामुळे ग्राहक सुकामेव्याच्या खरेदीला पसंती देत आहे. यात खारीक, खोबरे, काजू, बदाम, मनुका यांना मोठी मागणी आहे. मात्र येत्या काही दिवसांत थंडी वाढणार असल्याने सुकामेव्याच्या मागणीत अधिकच वाढ होणार आहे.
- जयंत पटेल, सुकामेवा विक्रेते