ई-लर्निंगचे आॅडिट करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:46 AM2018-07-21T00:46:41+5:302018-07-21T00:46:57+5:30
महापालिका शाळा डिजिटल करण्यासाठी अंदाजपत्रकात ११ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यानुसार आता अंमलबजावणीच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
नाशिक : महापालिका शाळा डिजिटल करण्यासाठी अंदाजपत्रकात ११ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यानुसार आता अंमलबजावणीच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र यापूर्वी ई-र्लनिंगच्या नावाखाली पाच कोटी रुपयांची साहित्य खरेदी करण्यात आली होती. त्याची सद्यस्थिती काय आहे, याच प्रथम आॅडिट करावे आणि मगच नवा प्रस्ताव अंमलात आणावा, अशी मागणी शिवसेना गटनेता विलास शिंदे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महासभेत सादर केलेला अशासकीय प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून, त्यातून अनेक गैरप्रकार उघड होण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिकेच्या शाळा डिजिटल करण्यासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात अकरा कोटी रुपयांची तरतूद असून, त्यानिमित्ताने शाळांचे सर्व काम डिजिटल पद्धतीने होणार आहे. सहा वर्षांपूर्वी महापालिकेच्या शिक्षण मंडळाने पाच कोटी रुपये खर्च करून महापालिका शाळांमध्ये स्क्रीन आणि प्रोजेक्टर बसविण्यात आले होते. यातील बहुतांशी साहित्य धूळखात पडून आहे सुरक्षिततेबाबत उपाययोजना केल्या किंवा नाहीत, त्याची खात्री करावी मागील काळात पाच कोटी रुपये खर्च करूनही योजना का कार्यान्वित झालेली नाही या सर्व बाबींचा शोध घेण्यात यावा, तसेच त्यासाठी लेखापरीक्षण करावे हे काम होईपर्यंत कोणत्याही नव्या प्रस्तावास मान्यता देऊ नये, अशी मागणी शिंदे यांनी ठरावात केली आहे.