पर्यावरणपूरक गणेश मंदिरांना परदेशात मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:21 AM2019-09-01T00:21:54+5:302019-09-01T00:22:54+5:30
आजच्या काळात महिला कुठल्याही क्षेत्रात मागे राहिल्या नसून आपल्या कलागुणांनी स्वत:चे नाव सातासमुद्रापार नेण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. नवनवीन प्रयोग करण्यात आजकालच्या महिला पुरुषांपेक्षा वेगाने पुढे जात आहेत.
नाशिक : आजच्या काळात महिला कुठल्याही क्षेत्रात मागे राहिल्या नसून आपल्या कलागुणांनी स्वत:चे नाव सातासमुद्रापार नेण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. नवनवीन प्रयोग करण्यात आजकालच्या महिला पुरुषांपेक्षा वेगाने पुढे जात आहेत. निशा वर्मा या तरुणीने नाशिकचा गणेशोत्सव परदेशात नेण्यास मोलाचा वाटा उचलला आहे. आपल्याकडे कला असेल तर कोणत्याही क्षेत्रात पुढे जाऊ शकतो. निशाने वडिलांच्या सहकार्याने पर्यावरणपूरक आरास गणेशमंदिरे तयार करत परदेशात रवाना करत आहे.
गणेशोत्सवात प्रत्येकजण आपल्या घरातील गणपतीसाठी वेगवेगळ्या सजावटी करत असतात. यामध्ये लाइटिंग, फुले तसेच मूर्तीला ठेवण्यासाठी थर्मोकोलचे मंदिरांचा वापर करत असतात. पण मागील वर्षीपासून शासनाकडून प्लॅस्टिक व थर्मोकोल बंदी केल्यामुळे असे मंदिरे बाजारात मिळत नाही. त्यामुळे थर्मोकोलला पर्याय म्हणून नाशिकच्या बापलेकीने नवा शोध लावत पीव्हीसी व डब्लूपीसी साहित्यांपासून घडी करता येणारे आकर्षक मंदिरे तयार केले आहे. या मंदिरांची विक्री त्या सरळ आॅनलाइन माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासह पंजाब, कोलकाता, दिल्ली, लखनऊ, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांसह परदेशातील आॅस्ट्रेलिया, लंडन, कॅनडा, अमेरिका या देशांत सुद्धा मंदिरांची विक्रीला सुरुवात केली आहे. हे मंदिरे वजनाने खूप हलकी असल्यामुळे सहज याची वाहतूक करता येते. अशी मंदिरे तयार करणारी ही पहिलीच तरुणी आहे.
१७ वर्षांपासून आमच्या घरी वडील थर्मोकोलचे सजावट साहित्य व मंदिरे बनवत होते. मात्र मागील वर्षींपासून थर्मोकोलवर शासनाकडून निर्बंध घालण्यात आल्यामुळे आम्ही पीव्हीसी व डब्लूपीसी या मटेरियलपासून मंदिरे बनविण्याची संकल्पना आणली. सुरुवातीला दहा मंदिरे बनविले, परंतु काही तासांतच त्यांची विक्री झाल्यामुळे यावर्षी उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला. तसेच आॅनलाइनच्या माध्यमातून देशभरासह परदेशातही विक्री करण्यास सुरुवात केली, या मंदिरांना मोठी मागणी आहे.
- निशा वर्मा, विक्रेती
सोशल मीडियाचा वापर
मागील वर्षी निशा यांनी अशा दहा मंदिरांची निर्मिती केली, पण काही तासांतच ही मंदिरे विकली गेल्यामुळे त्यांचा उत्साह बळावला. त्यामुळे यावर्षी त्यांनी अशा मंदिरांचे उत्पादन वाढविण्यास सुरुवात केली. तसेच तंत्रज्ञानाचा फायदा घेत मंदिरांची आॅनलाइन जाहिरात केली आणि बेबसाइट, फेसबुक पेज तयार करत यावरून थेट परदेशातील आॅर्डर घेण्यास सुरुवात केली.