शाळा, रुग्णालयांच्या बाहेरील वाहने टोइंगमधून वगळ्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:53 AM2018-08-30T00:53:25+5:302018-08-30T00:54:03+5:30
रुग्णालय, शाळा, एटीएमबाहेर अल्प कालावधीसाठी उभी केलेली दुचाकी वाहने टोइंग करू नये, वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांची अरेरावी थांबवावी, अशी मागणी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अजय देवरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
नाशिक : रुग्णालय, शाळा, एटीएमबाहेर अल्प कालावधीसाठी उभी केलेली दुचाकी वाहने टोइंग करू नये, वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांची अरेरावी थांबवावी, अशी मागणी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अजय देवरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील वर्दळीच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहनधारकांची अडचण होते, परिणामी वाहनधारक नाइलाजास्तव रस्त्यावर वाहने उभी करतात त्याचप्रमाणे रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाईक, शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक व एटीएममधून पैसे काढण्यास आलेले नागरिक कमी वेळ लागावा म्हणून काही मिनिटांसाठी रस्त्यावर वाहने उभी करतात. मात्र वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून रस्त्यावर वाहने उभी केल्याच्या कारणावरून टोइंग केली जाते. वाहनाजवळ वाहनधारक उभे असतानासुद्धा ठेकेदाराचे कर्मचारी वाहने उचलून नेतात तसेच एखाद्याने जागेवर दंडाची रक्कम भरण्याची इच्छा व्यक्त केली तरी ऐकले जात नाही. त्यामुळे दोन ते तीन मिनिटांच्या कामांकरिता रुग्णालय, शाळा व एटीएमबाहेर तात्पुरती पार्क केलेल्या वाहनांना वाहतूक नियमांत सूट देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शहराध्यक्ष अंबादास खैरे, अॅड. चिन्मय गाढे, अमोल आव्हाड, नवराज, संतोष भुजबळ, रामराजे, नीलेश सानप, दीपक पाटील आदी उपस्थित होते.