कंत्राटी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:14 AM2021-04-06T04:14:04+5:302021-04-06T04:14:04+5:30
महापालिकेने कंत्राटी वैद्यकीय कर्मचारी, तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यांना त्वरित मुदतवाढ द्यावी. मानधनावरील कर्मचारी, नर्स यांनाही मुदतवाढ देऊन त्यांचे वेतन ...
महापालिकेने कंत्राटी वैद्यकीय कर्मचारी, तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यांना त्वरित मुदतवाढ द्यावी. मानधनावरील कर्मचारी, नर्स यांनाही मुदतवाढ देऊन त्यांचे वेतन त्वरित अदा करावे, अशी मागणी नगरसेवक जगदीश पवार यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
मनपा आयुक्त कैलास जाधव यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अऩेक डॉक्टर २०१८ पासून महापालिकेत नियुक्त आहेत. दर सहा महिन्यांनी त्यांना मुदतवाढ दिली जाते. मात्र, १२ जानेवारीला मुदत संपूनही त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली नाही. डॉक्टरांनी याबाबत विचारणा केली असता प्रशासन कोविडचे कारण पुढे करते. फाईल वर पाठविली असे उत्तर देते. तरीही ते कोविड काळात नियमितपणे काम करीत आहेत. या सर्वांना मुदतवाढ देऊन थकीत वेतन द्यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जगदीश पवार, राष्ट्रवादी काँँग्रेसचे नाशिकरोड अध्यक्ष मनोहर कोरडे, प्रशांत वाघ आदींच्या सह्या आहेत.
इन्फो
जानेवारीपासून नाही वेतन
या डॉक्टरांना जानेवारीपासून वेतनही मिळालेले नाही. महापालिकेकडे फक्त बारा हजार रुपये मानधनावर काम करणाऱ्या ७२ स्टाफ नर्स असून त्यांनाही जानेवारीपासून वेतन मिळालेले नाही. त्यांनाही मुदतवाढ मिळालेली नाही.