आरक्षणासह आर्थिक विकास महामंडळाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:56 AM2018-12-24T00:56:39+5:302018-12-24T00:57:41+5:30

राज्य सरकारने मराठा समाजासाठी १६ टक्के आरक्षण दिल्यानंतर त्यापाठोपाठ आता मुस्लीम तसेच धनगर समाजाचेही आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे़ बुद्धिवादी म्हणून ओळख असलेल्या ब्राह्मण समाजालाही आता बदलत्या काळानुसार आरक्षणाची नितांत आवश्यकता असून,

 Demand for financial development corporation with reservation | आरक्षणासह आर्थिक विकास महामंडळाची मागणी

आरक्षणासह आर्थिक विकास महामंडळाची मागणी

Next

नाशिक : राज्य सरकारने मराठा समाजासाठी १६ टक्के आरक्षण दिल्यानंतर त्यापाठोपाठ आता मुस्लीम तसेच धनगर समाजाचेही आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे़ बुद्धिवादी म्हणून ओळख असलेल्या ब्राह्मण समाजालाही आता बदलत्या काळानुसार आरक्षणाची नितांत आवश्यकता असून, तत्पूर्वी युवती व महिलांची सुरक्षितता तसेच तरुणांच्या विकासासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची मागणी ब्राह्मण समाजाच्या महाचर्चेतून रविवारी (दि़२३) समोर आली़ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या त्र्यंबकरोडवरील अभ्यंकर सभागृहात ‘ब्राह्मण समाजास आरक्षण हवे की नको’ या विषयावर महाचर्चा घेण्यात आली़ या महाचर्चेनंतर सहा ठराव पारीत करण्यात आले असून, पूर्ततेसाठी दबावगट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत़
पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी ब्राह्मण समाजाने प्रांत व शाखाभेद विसरून एकमेकांमध्ये रोटी-बेटीचा व्यवहार करणे आवश्यक असल्याचे सांगितले़ तसेच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास गृहीत धरले असून, जोपर्यंत समाजाच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत निवडणुकीत मतदान न करण्याची तसेच दबावगट तयार करण्याची सूचना मांडली़ सरकारने मोठ्या प्रमाणात खासगीकरण सुरू केले असून, आरक्षणाच्या मागणीपूर्वीच निर्माण झालेल्या नोकऱ्यांच्या उपलब्धतेबाबत प्रश्न उपस्थित करून उद्योगाकडे वळण्याचे आवाहन निमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केले़ तर देशस्थ ऋग्वेदी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सरस्वतीला लक्ष्मीची जोड आवश्यक असून, यासाठी समाजाने एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगितले़
गुजरातमधून ब्राह्मण आरक्षणाचा मुद्दा समोर आला असून ही काळाची गरज आहे़ शिक्षण वा नोकरीमध्ये आरक्षण नाही तसेच विद्यार्थी अभ्यास करून जास्त टक्के पाडतात, मात्र त्यांना प्रवेश मिळत नाही़ समाजाला आरक्षण आवश्यक असले तरी त्यापूर्वी समाजातील युवकांच्या प्रगतीसाठी सर्वप्रथम आर्थिक विकास महामंडळ तसेच महिला व युवतींची सुरक्षितता आवश्यक असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गणेश गोखले होते़ व्यासपीठावर संस्थेचे कार्यवाह उदयकुमार मुंगी, नगरसेवक दीपाली कुलकर्णी व अ‍ॅड़ श्यामला दीक्षित, अ‍ॅड. भानुदास शौचे, अ‍ॅड. अविनाश भिडे, अ‍ॅड. नागनाथ गोरवाडकर, माधव भणगे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक उदयकुमार मुंगी यांनी तर सूत्रसंचालन सुभाष सबनीस यांनी केले.
मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात येणारे ठराव
देशातील विविध जाती-जमातींच्या आरक्षणास ब्राह्मण समाजाचा विरोध नाही़
ब्राह्मण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून योग्य पाठबळ, शासकीय योजना व विशेष सवलती ब्राह्मण समाजास मिळणे आवश्यक असून त्यासाठी समाज एकत्र आला आहे़
ब्राह्मण समाजासाठी भगवान श्री परशुराम आर्थिक विकास महामंडळाची तातडीने स्थापना करावी़
ब्राह्मण समाजाकरिता सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक सवलती योजना जाहीर करून निधी देण्यात यावा़
देशातील महापुरुषांची बदनामी रोखण्यासाठी कायदा करून कडक अंमलबजावणी करावी़
पुरोहित वर्ग, वेद पाठशाळा व आर्थिक दुर्बल घटकांच्या मानधनासाठी योजना आखून अंमलबजावणी करण्यात यावी़

Web Title:  Demand for financial development corporation with reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.