राजापूर गटात चारा छावणी सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:03 AM2018-11-15T00:03:19+5:302018-11-15T00:12:56+5:30
दुष्काळग्रस्त घोषित झालेल्या राजापूर जिल्हा परिषद गटात चारा छावणी सुरू करावी यासह दुष्काळी कामे सुरू करावीत या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारुळे यांना देण्यात आले. नायब तहसीलदार बी.एम. हांडगे यांनी निवेदन स्वीकारले.
राजापूर : दुष्काळग्रस्त घोषित झालेल्या राजापूर जिल्हा परिषद गटात चारा छावणी सुरू करावी यासह दुष्काळी कामे सुरू करावीत या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारुळे यांना देण्यात आले. नायब तहसीलदार बी.एम. हांडगे यांनी निवेदन स्वीकारले. राजापूर गट हा कायमस्वरूपी दुष्काळी स्थितीचा आहे. या गटात शेतीला सिंचनासाठी पाटपाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने डोंगराळ भाग व हलकी जमीन असल्याने सर्व चारा व पिके पावसाअभावी जळून खाक झाली आहेत. तालुक्यातील दुष्काळाच्या झळा गटाला सोसाव्या लागत आहेत. चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे चारा पाण्यावाचून शेतोपयोगी जनावरे विकावी लागतील नाही तर दावणीलाच चारा पाण्याअभावी मरतील अशी भयाण स्थिती उद्भवली आहे.
राजापूर हे गाव येवला व नांदगाव तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून, या ठिकाणी चारा छावणी सुरू केल्यास दोन्ही तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकरी वर्गास या छावणीचा उपयोग होईल. या मागणीचा विचार करून राजापूर येथे त्वरित चारा छावणी सुरू करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष आनंद शिंदे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दत्ता सानप, तालुका सरचिटणीस प्रा. नानासाहेब लहरे, कृष्णा कव्हात, संतोष काटे उपस्थित होते. निवेदनाच्या प्रती मुखमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, दिंडोरी लोकसभा खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना पाठविण्यात आल्या आहे.