ग्राहकांची विदेशी फळांना मागणी
By Admin | Published: December 27, 2015 10:05 PM2015-12-27T22:05:43+5:302015-12-27T22:13:49+5:30
द्राक्षांची आवक सुरू : चीनचे ड्रॅगन फळ उपलब्ध
नाशिक :सध्या बाजारात देशी-विदेशी फळे उपलब्ध आहेत. थंडीचे दिवस सुरू झाले की सफरचंद, द्राक्षे आणि स्ट्रॉबेरीचे ग्राहकांना आकर्षण असते. यंदा बाजारात चीनचे ड्रॅगन फळ उपलब्ध झाले आहे.
या फळाचे गुणधर्म रक्तवाढ आणि पांढऱ्यापेशी कमी असल्यास वाढविणे हे आहे. याची किंमत प्रतिनग १२0 रुपये आहे. ग्राहकांच्या पहिल्या पसंतीचे हे फळ ठरले आहे. न्यूझीलंडच्या किवी फळातदेखील ड्रॅगनचेच गुणधर्म आहेत. या फळाची किंमत प्रतिनग ३0 रुपये आहे. सर्वांत जास्त मागणी असणारे सफरचंद आहे. सफरचंदमध्ये किन्नोर १४0 रु. किलो, वॉशिंग्टन १८0 रु. किलो, फ्युजी २00 रुपये किलो, काश्मिरी सफरचंदला मागणी असून, सर्वांत जास्त विक्री आहे. महाबळेश्वरची प्रसिद्ध स्ट्रॉबेरीदेखील बाजारात उपलब्ध झाली आहे. स्ट्रॉबेरीची किंमत ५0 रुपये २00 ग्रॅम आहे. ड्रॅगन व किवी फळाबरोबर आॅस्ट्रेलियाचे आलुबुखार रक्तवाढीसाठी गुणकारी असल्याने ३00 रु. किलोने उपलब्ध झाले आहे. थायलंडच्या चिंचेने ग्राहकांच्या जिभेला पाणी सुटत आहे. चिंचेची किंमत ८0 रु. प्रति २५0 ग्रॅम आहे.
आंब्याचा हंगाम सुरू होण्यास अद्याप वेळ असला तरी हैदराबादचा लालबाग आंबा ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. या आंब्याची आवक मात्र कमी आहे. याची किंमत १५0 रु. किलो आहे. भद्रकाली फळबाजारात हे फळ उपलब्ध आहे.
नाशिकच्या द्राक्षाबरोबरच विदेशी द्राक्षाचीदेखील बाजारात आवक होत आहे. विदेशी द्राक्षांची किंमत आवाक्याबाहेरची आहे. कॅलिफोर्नियाचे रेडग्लोब व ब्लॅकग्रेप्स बाजारात उपलब्ध आहे. रेडग्लोबची किंमत ३५0 रु. आणि ब्लॅकग्रेप्सची किंमत ४५0 रुपये प्रतिकिलो आहे. संत्र्याला बाजारभाव नसल्याने २0 रु. किलोने ग्राहकांना मिळत आहे. अपवाद पंजाबची संत्री ८0 रु. प्रतिकिलो दराने मिळत आहे. सोलापूर व पुणे येथून द्राक्षांची आवक सुरू झाली आहे. ग्राहकांना हे द्राक्षे विदेशी द्राक्षांच्या दरापेक्षा कमी दरात उपलब्ध होतील, असे फळ विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
डाळिंबाच्या भावात घट
डाळिंबाला बाजार नसल्याने शेंद्री व मृदुला डाळींब ८0 रु. प्रतिकिलोने मिळत आहे. बाजारात विविध फळांची आवक सुरू झाली आहे. ग्राहक थंडीमध्ये फळांची जास्त प्रमाणात खरेदी करतात. त्यामुळे फळांची दुकाने विविध फळांनी भरलेली दिसत आहे. फळविक्रेत्यांमध्ये विक्री वाढल्याने आनंदाचे वातावरण दिसत आहे. फळविक्रेत्यांच्या दुकानांबरोबर हातगाडीवर फळविक्री करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढलेली दिसत आहे. ग्राहकांना आपल्या परिसरातच फळांची खरेदी करता येत आहे. हातगाडीवर बोरे विकताना विक्रेते जास्त प्रमाणात दिसत आहेत. संपूर्ण बाजाराचा आढावा घेतला असता विदेशी फळे महाग आहेत. तरी त्यांची मागणी वाढत आहे. नाशिकमधील भद्रकाली फळ बाजारात देशी-विदेशी फळे ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.