जावयाच्या हौसेसाठी चारचाकीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 01:15 AM2021-07-31T01:15:20+5:302021-07-31T01:16:23+5:30
घरात व्यवस्थित स्वयंपाक करता येत नाही तसेच काम करता येत नाही. एकुलता एक जावई आहे त्याची हौस करण्यासाठी चारचाकी खरेदीसाठी माहेरून तीन लाख रुपयांची रक्कम आणावी या कारणावरून कुरापत काढून २३ वर्षीय नवविवाहितेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटी : घरात व्यवस्थित स्वयंपाक करता येत नाही तसेच काम करता येत नाही. एकुलता एक जावई आहे त्याची हौस करण्यासाठी चारचाकी खरेदीसाठी माहेरून तीन लाख रुपयांची रक्कम आणावी या कारणावरून कुरापत काढून २३ वर्षीय नवविवाहितेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत निफाड तालुक्यातील सोनगावला राहणाऱ्या सोमनाथ मनीलाल सुकेणकर यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी पतीसह तिघांना अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी वैष्णवी नितीन कर्पे (२३) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. सुकेणकर यांची मुलगी वैष्णवी हिचा विवाह वर्षभरापूर्वी आडगाव शिवारातील धात्रक फाटा बळीरामनगर येथे राहणाऱ्या नितीन भाऊलाल कर्पे याच्यासमवेत झाला होता. मात्र लग्नानंतर काही दिवसांनी पती नितीन, सुनीता कर्पे (सासू), रा. स्वर्णप्रभा बंगला, रोशना अभिजित शिंदे, अभिजित शिंदे, तसेच प्रियंका महेश कदम, महेश कदम आदींनी मयत विवाहिता वैष्णवी हीस तुला व्यवस्थित काम करता येत नाही, स्वयंपाक करता येत नाही असे म्हणून तिला वारंवार उपाशी ठेवत पती नितीन याला फिरण्यासाठी व त्याची हौस पूर्ण करण्यासाठी चारचाकी खरेदी करायची असल्याने माहेरून तीन लाख रुपयांची रोकड आणावी यासाठी वारंवार शारीरिक व मानसिक छळ सुरू केला होता.
सासरकडच्या मंडळींकडून वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून नवविवाहिता असलेल्या वैष्णवी हिने अखेर दोन दिवसांपूर्वी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.