अंत्यविधीचे साहित्य मोफत देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 05:00 PM2019-02-13T17:00:19+5:302019-02-13T17:00:49+5:30
मालेगाव : शहरातील हिंदू-दलित स्मशानभूमीत आर्थिक दुर्बल घटकातील जनतेस अंत्यविधीसाठी लागणारे लाकूड, रॉकेल आदि साहित्य मोफत उपलब्ध व्हावे या दृष्टीकोनातून मालेगाव महानगरपालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात खर्चाची विशेष तरतूद करावी, असे साकडे सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महापौर रशीद शेख, स्थायी समिती सभापती जयप्रकाश बच्छाव, आयुक्त किशोर बोर्डे यांना घातले आहे.
नगरसेवक अॅड. गिरीष बोरसे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या शिष्ठमंडळाने स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी मोफत साहित्य उपलब्ध करुन देण्याबाबत महापालिका प्रशासनाला साकडे घातले. नाशिक, धुळे, जळगाव महानगरपालिका आणि सटाणा नगरपरिषदेतर्फे अंत्यविधीसाठी हिंदू-दलित समाजातील आर्थिक दुर्बलांना लाकडे व रॉकेलची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेमुळे गोरगरीबांना निश्चितच मदत होत आहे. मालेगाव शहरात ८० टक्के कामगार वर्गाचे शहर आहे. गोरगरीब जनतेस आर्थिक मंदीमुळे दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत पडली आहे. अशा आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांना अंत्यविधीसाठी लागणारे लाकूड, रॉकेल आदि साहित्य मोफत उपलब्ध करुन दिल्यास निश्चित दिलासा मिळेल. महापालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात या खर्चाची तरतूद करत गोरगरीब जनतेस दिलासा देण्यात यावा, अशी मागणी भारत म्हसदे, जितेंद्र देसले, बापू पवार, आनंद भोसले, गुलाब पगारे, गोटू भरत पाटील, तुषार जगताप, राम गवळी, उतञतम कचवे, भरत चौधरी, मनोज पाटील, राहूल जगताप, संजय पाटील, अॅड. मधुकर वडगे, किरण पाटील, निंबा बोरसे, चेतन सूर्यवंशी, राजेंद्र गोलाईत, भारत बेद, प्रमोद पाटील, मिलींद गोसावी, चेतन सूर्यवंशी, मधुकर अहिरे आदिंसह सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली आहे