झोपडपट्टी परिसरात धूरफवारणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:41 AM2021-01-08T04:41:57+5:302021-01-08T04:41:57+5:30
अंतर्गत रस्त्यावरील वाहतूक कोंडी नाशिक : मुंबई नाका परिसर ते गडकरी चौक, गडकरी चौक ते सारडा सर्कल यादरम्यानच्या अंतर्गत ...
अंतर्गत रस्त्यावरील वाहतूक कोंडी
नाशिक : मुंबई नाका परिसर ते गडकरी चौक, गडकरी चौक ते सारडा सर्कल यादरम्यानच्या अंतर्गत मार्गावर अनेक वाहने दुतर्फा उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने निर्माण होत आहे. या परिसरात अनेक व्यावसायिक इमारती तसेच रुग्णालये आहेत. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची संख्यादेखील मोठी असते. निर्धारित पार्किंगअभावी रस्त्यावरच आपली वाहने उभी करून अन्य वाहनांना अडथळा निर्माण करीत आहेत.
शहरात डासांचा प्रादुर्भाव
नाशिक : शहराच्या झोपडपट्टी आणि पाण्यालगतच्या परिसरात डासांचा उपद्रव वाढलेला आहे. अनेक मोकळ्या भूखंडांवर गवत वाढल्यामुळेदेखील डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्यातच नुकताच अवकाळी पाऊस पडून गेल्याने डासांच्या उत्पत्तीत आणि उच्छादात वाढ होण्याची शक्यता आहे.
मेन रोड परिसरात पुन्हा कोंडी
नाशिक : शहरातील मेन रोड, रविवार कारंजा, टिळक पथ तसेच मुख्य रस्त्यावरील कोंडीची समस्या अजूनही कायम आहे. या मार्गांवरून अजूनही चारचाकी वाहने तसेच छोट्या मालवाहू रिक्षा मोठ्या प्रमाणात जात असल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागते. या ठिकाणी सर्वत्र दुकानांची मोठी संख्या असल्याने सातत्याने गर्दी असते. या मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीला शिस्त लावण्याची मागणी करण्यात येत आहे.
पावसामुळे वाढला गारठा
नाशिक : शहरात गत तीन दिवस थंडीचे प्रमाण कमी झालेले होते. त्यामुळे वातावरणातील थंडीच गायब झाल्यासारखे वाटत होते; मात्र गुरुवारी दुपारी शहर परिसरात पडलेल्या पावसामुळे गारठ्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सर्दी, पडशाच्या तक्रारींमध्येदेखील वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.