आयमात जिल्हा उद्योगमित्र सभा घेण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:41 AM2019-01-29T00:41:37+5:302019-01-29T00:41:54+5:30
अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतींमधील उद्योजकांच्या समस्या व अडचणींबाबत जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दर तीन महिन्यांनी घेण्यात येत असलेली जिल्हा उद्योगमित्र सभा (झुम) यापुढील काळात आयमाच्या रिक्रिएशन सेंटरमध्ये घ्यावी याबाबत शिष्टमंडळाने नुकतेच जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश रेंदाळकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
सिडको : अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतींमधील उद्योजकांच्या समस्या व अडचणींबाबत जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दर तीन महिन्यांनी घेण्यात येत असलेली जिल्हा उद्योगमित्र सभा (झुम) यापुढील काळात आयमाच्या रिक्रिएशन सेंटरमध्ये घ्यावी याबाबत शिष्टमंडळाने नुकतेच जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश रेंदाळकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार, माजी अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश रेंदाळकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये लघुउद्योजकांची संख्या अधिक आहे. लघुउद्योजकांच्या समस्या मोठ्या प्रमाणात असून, त्यांना व्यवसाय करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लघुउद्योजकांच्या बहुतांश समस्या व अडचणींच्या उपाययोजना जिल्हा उद्योगमित्राच्या बैठकीत केल्या जातात व त्यांची सोडवणूक केली जाते. त्यामुळे सदर बैठक आयमाच्या सभागृहात घेतल्यास उद्योजकांना अडचणी मांडून त्यांची सोडवणूक होण्याची अपेक्षा शिष्टमंडळाने यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी आयमाचे माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे, उन्मेश कुलकर्णी, राजेंद्र पानसरे, दिलीप वाघ, गोविंद झा आदी उपस्थित होते.
उपाययोजना कराव्यात
अंबड औद्यागिक वसाहतीमधील अग्निशामक केंद्र सुरू करावे, तळेगाव अकाळे येथील औद्योगिक वसाहतींतील डिफेन्स हबसाठी जागा आरक्षित करावी, जुने पथदीप बदलून नवीन पथदीप यंत्रणा कार्यान्वित करावी याबरोबरच सांडपाणी व्यवस्थापन व्हावे, स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यात यावी याबाबत झुमच्या बैठकीत चर्चा करण्यात यावी याबाबतही निवेदनाद्वारे महाव्यवस्थापक प्रकाश रेंदाळकर यांना सुचित करण्यात आले आहे.