सुटीचा मोबदला अदा करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:20 AM2021-06-16T04:20:15+5:302021-06-16T04:20:15+5:30
नाशिक- महापालिका शिक्षण विभागात शाळांमध्ये काम करणाऱ्या सुरक्षारक्षकांना सुटीच्या कामाचा मोबदला द्यावा, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने ...
नाशिक- महापालिका शिक्षण विभागात शाळांमध्ये काम करणाऱ्या सुरक्षारक्षकांना सुटीच्या कामाचा मोबदला द्यावा, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने आयुक्तांकडे करण्यात आली आहे. महापालिकेच्या अन्य विभागांतील सुरक्षारक्षकांना ज्याप्रमाणे सुटीच्या कामाचा मोबदला अदा केला जातो, तसा या कर्मचाऱ्यांना देण्याबाबत आयुक्तांनी आदेश निर्गमित केले आहेत. मात्र, त्यानंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नाही, अशी तक्रार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी केली आहे.
----
छत्रपती सेनेच्या वतीने वृक्षारोपण
नाशिक- छत्रपती सेनेच्या वतीने झाडे लावा, ऑक्सिजन वाढवा मोहिमेंतर्गत चुंचाळे गावाजवळील दत्तनगर येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संदीप निगळ, सागर पवार, योगेश सोनवणे, गणेश पाटील, मुकेश पाटील, दत्ता पवार यांच्यासह अन्य परिसरातील मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
-------
तिसऱ्या लाटेची तयारी करण्याची मागणी
नाशिक- कोरोनाची दुसऱ्या लाटेतील अडचणी लक्षात घेऊन तिसऱ्या लाटेची तयारी आताच करावी आणि इंजेक्शन तसेच औषधांची मागणी आताच नोंदवण्याची मागणी पंचवटीतील नगरसेवकांच्या वतीने करण्यात आली आहे. गुरुमित बग्गा, विमल पाटील आणि नंदिनी बोडके यांनी यासंदर्भात आयुक्तांना निवेदन दिले आहे. कोरोनाची लाट तीव्र असतानाच रुग्णालयातील बेड तसेच इंजेक्शन आणि अन्य साहित्य मिळविण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्या पार्श्वभूमीवर आताच साठा करून ठेवण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
----
दिव्यांगांचे लसीकरण करा, भामरे यांची मागणी
नाशिक- शहरातील दिव्यांगांच्या लसीकरणाची कोणतीही सोय महापालिकेने केलेली नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी महिला व बाल कल्याण समिती सभापती स्वाती भामरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आयुक्तांना निवेदन दिले असून, लसींचा मुबलक पुरवठा सुरू झाल्यास तत्काळ दिव्यांगांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात येईल, असे आयुक्त कैलास जाधव यांनी त्यांना सांगितले.
----
स्थायी समितीची उद्या बैठक
नाशिक- महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक बुधवारी (दि. १६) सकाळी साडेअकरा वाजता ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यावेळी काेराेनाकाळातील बायोमेडिकल वेस्ट उचलण्याचे बिल तसेच डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या आवारात ऑक्सिजन टाकी उभारण्याचे काम करण्यासाठी कार्योत्तर मंजुरीचे प्रस्ताव असल्याची माहिती स्थायी समितीचे गणेश गिते यांनी दिली.