खड्डे त्वरित बुजविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:14 AM2021-03-06T04:14:05+5:302021-03-06T04:14:05+5:30
रस्त्याच्या दुतर्फा भाजीविक्री नाशिक : दिंडोरी रोडवर भाजीविक्रेत्यांकडून रस्त्यालागत दुतर्फा भाजी विक्री होत असल्याने, वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. ...
रस्त्याच्या दुतर्फा भाजीविक्री
नाशिक : दिंडोरी रोडवर भाजीविक्रेत्यांकडून रस्त्यालागत दुतर्फा भाजी विक्री होत असल्याने, वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या भागात दुपारी आणि संध्याकाळी भाजीखरेदीसाठी येणाऱ्या गाहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने, त्यांची वाहनेही रस्त्यात उभी केली जातात. त्यामुळे त्या रस्त्याने वाहन चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते.
मोबाइल अतिवापराने बालकांना नेत्रविकार
नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे पुन्हा शाळा बंद झाल्या असल्याने, बहुतांश शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरूच ठेवले आहे. त्यात क्लासही ऑनलाइन होत आहेत. त्यामुळे विद्यार्थी मोबाइल, टॅब, लॅपटॉपच्या मदतीने शिक्षण घेत असल्याने, विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम वाढला आहे. त्यामुळे गत वर्षाप्रमाणेच पुन्हा बालकांमध्ये नेत्रविकार वाढत आहेत.
मोकाट श्वानांकडे दुर्लक्षामुळे नाराजी
नाशिक : शहरातील सातपूर परिसरात मोकाट श्वानांचा सुळसुळाट झाला आहे. रात्रीच्या वेळी हे श्वान रस्त्यावरच ठाण मांडून बसतात. काही वेळा श्वान वाहनांच्या पाठीमागे धावत असल्याने वाहनचालकांची तारांबळ उडते, तर कधी दुचाकी घसरून चालक जखमी झाल्याचे प्रकारही घडत असल्याने, या भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
जुने नाशिक परिसरात डासांचा प्रादुर्भाव
नाशिक : जुने नाशिक परिसरातील जुने वाडे, पडके वाडे, खड्ड्यांच्या जागांमध्ये पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरात आधीच कोरोनाने थैमान घातले असताना, डासांमुळे मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांचा फैलाव होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे जुने नाशिकमध्ये दर आठवड्याला धूर फवारणी करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
सायकल ट्रॅक खुला करावा
नाशिक : महानगरात त्र्यंबक नाक्यापासून सुरू झालेले सायकल ट्रॅकचे काम वर्षभरापासून सुरूच आहे. कामाला आता गती देणे आवश्यक आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करून सायकलप्रेमींसाठी सायकल ट्रॅक सुरू करण्याची मागणी सायकलप्रेमींकडून करण्यात येत आहे.