ग्रामीण भागात बसफेऱ्या वाढविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:49 AM2021-02-05T05:49:19+5:302021-02-05T05:49:19+5:30
गेल्या वर्षभरानंतर शाळा, महाविद्यालये आता हळूहळू पूर्वपदावर येत असून सिन्नर आगाराकडून मात्र कमी बस असल्याकारणाने खेडेगावातील शालेय विद्यार्थ्यांची ...
गेल्या वर्षभरानंतर शाळा, महाविद्यालये आता हळूहळू पूर्वपदावर येत असून सिन्नर आगाराकडून मात्र कमी बस असल्याकारणाने खेडेगावातील शालेय विद्यार्थ्यांची ताराबंळ होत आहे. ग्रामीण भागात प्रत्येक खेडोपाडी नियमित येणारी एकच बस फेऱ्या मारत असल्याने विद्यार्थी बसच्या खाली राहिला तर परत बस फेरी मारून येईपर्यंत शाळेची वेळ निघून जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागते. तालुक्यातील ठाणगाव,पाडळी,आडवाडी, सोनांबे, कोनांबे, दापूर, पाढुर्ली आदी पश्चिम भागातील खेडेगावातील विद्यार्थी व विद्यार्थिनींची शिक्षणासाठी सिन्नरसारख्या तालुक्याच्या ठिकाणी ये-जा होत असते. सिन्नर आगारातील कमी बस सेवेमुळे शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी कमी बस असल्याने विद्यार्थ्यांना तासनतास बसावे लागत आहे. सिन्नर आगारातील केवळ ५५ गाड्यांनीच संपूर्ण प्रवाससेवा सुरू आहे. सिन्नर आगारातील १० बस मुंबई येथे वाहतुकीसाठी देण्यात आलेल्या आहेत. या बस पुन्हा बोलविणे गरजेचे असून याबाबत सिन्नर आगाराच्यावतीने पुढाकार घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना एक दिवसाआड शाळा असल्याने विद्यार्थी पास काढण्यासाठी कोणीही पुढे सरसावत नाही. त्यामुळे आगाराच्यावतीने दररोजचे उत्पन्न वाढण्यासाठी बस फेऱ्या वाढविण्याची मागणी पालक वर्गाकडून करण्यात येत आहे .
कोट....
ग्रामीण भागातून येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनी पास काढून घ्यावे. जितक्या प्रमाणात पास वाढले जातील त्याप्रमाणे त्या-त्या भागातील बसेसची संख्या वाढविण्यात येईल. शालेय विद्यार्थ्यांकडून पूर्ण महिनाभराच्या पासची रक्कम आकारणी केली जात नसून फक्त दहा दिवसांचीच आकारणी केली जात आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी पास काढून घ्यावेत म्हणजे त्या भागात बसेस सोडता येतील.
- एस. एच. काळे, स्थानक प्रमुख
कोट....
पूर्वी आगारात असलेली वाहनांची स्थिती पूर्ण केल्यास कामगारांना नियमित कामगिरी मिळणेस सुलभ होऊन विद्यार्थी संख्या व प्रवासी संख्या वाढ होत असल्याने बसेस वाढ होणे गरजेचे आहेत.
- देवा सांगळे, सचिव, एसटी कामगार सेना