पिंपळस ग्रामपंचायतीतील गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 01:30 AM2021-12-13T01:30:34+5:302021-12-13T01:30:58+5:30
निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे येथील ग्रामपंचायतीत झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची ग्रामविकास मंत्रालयामार्फत चौकशी करण्यात यावी व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते बाजीराव लोखंडे यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
नाशिक : निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे येथील ग्रामपंचायतीत झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची ग्रामविकास मंत्रालयामार्फत चौकशी करण्यात यावी व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते बाजीराव लोखंडे यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
निफाड तालुक्यातील मौजे पिंपळस रामाचे येथील ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय अनुदानाच्या रकमेचा अपहार होऊन झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी यासाठी निफाडच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे अर्ज करण्यात आला होता मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे धाव घेतली होती. मुख्याधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश संबंधितांना देऊनही त्याकडे तालुका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. त्यानंतर लोखंडे यांनी ऑक्टोबर महिन्यात या संदर्भात उपोषण सुरु केले होते. या उपोषणाची दखल घेऊन गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन एक महिन्यात या प्रकरणाची चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र एक महिना उलटूनही अद्याप या प्रकरणाची कोणतीही चौकशी झाली नाही. यासंदर्भात लोखंडे यांनी आता थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ग्रामविकास मंत्रालयामार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. याबाबत योग्य कार्यवाही न झाल्यास दि. २६ जानेवारीपासून निफाड तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.