कांदा निर्यात बंदी उठविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 05:16 PM2020-01-27T17:16:00+5:302020-01-27T17:16:25+5:30
सिन्नर : राज्य सरकारने केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदी त्वरीत उठवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान थांबवावे अशी मागणी राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्यासह शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कांदा निर्यातबंदीमुळे राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज कांदा दरात या हंगामातील सर्वात मोठी घसरण झाली आहे. आठवडाभरापूर्वी चार हजार रूपये प्रती क्विंटल असा दर होता तो आज सरासरी दोन हजार दोनशे इतका झाला आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदी त्वरित उठवून कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे होणारे आर्थिक नुकसान थांबवावे, अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना राज्यभर तीव्र आंदोलन करेल अशा आशयाचे निवेदन राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार नरेंद्र वाघ यांना देण्यात आले.
यावेळी नवनाथ बर्के, प्रकाश काकड, किरण बर्के, संतोष कापडी, शरद आव्हाड, योगेश बर्के,शिवनाथ कापडी, ज्ञानेश्वर कापडी, भाऊसाहेब कांगणे, भगवान सानप, शरद बर्के, हरीओम कापडी यांच्यासह कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.