दुष्काळ व्यवस्थापन संहितेची नक्कल मराठीत उपलब्ध करुन देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 04:45 PM2019-02-11T16:45:51+5:302019-02-11T16:46:37+5:30
मालेगाव : दुष्काळ व्यवस्थापन संहितेची नक्कल मराठीत उपलब्ध करुन द्यावी तसेच त्यानुसार उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसिलदार ज्योती देवरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मनसेच्या पदाधिका-यांनी यापूर्वी तालुक्यात दुष्काळी उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी केली होती. मात्र प्रशासन कागदावरच दुष्काळी योजना राबवित असल्याचा आरोप मनसेने करीत २०१६ मध्ये तयार करण्यात आलेल्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेची नक्कल मराठीत उपलब्ध करुन द्यावी, सर्वसामान्य शेतकºयाला इंग्रजीतील मजकुर कळत नाही, दुष्काळी भागात पाण्याचे टॅँकर, चारा छावण्या, रोजगार हमी योजनेची कामे, बेरोजगारांना कामे, ग्रामीण गोदाम योजना, शीतगृह, शेवाळ शेती, कडबा कुट्टी यंत्र उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष राकेश भामरे, मधुकर वडगे, सोहन बिरारी, किशोर गवळी, दीपक पौडेकर, भरत सूर्यवंशी, गणेश पवार, राहूल बच्छाव, मोहसिन शेख, चेतेस असेरी, विशाल शेवाळे आदिंनी केली आहे.