झेंडूची मागणी अधिक; पुरवठा कमी
By Admin | Published: October 20, 2015 09:50 PM2015-10-20T21:50:14+5:302015-10-20T21:50:32+5:30
मुहूर्त दसऱ्याचा : अल्प पावसाने घटले उत्पादन
नाशिक : दसरा-दिवाळीला झेंडूच्या फुलांना सर्वाधिक मागणी असते. या पार्श्वभूमीवर फुलशेती करणारे शेतकरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झेंडूचे उत्पादन घेतात; मात्र यंदा वरुणराजाने पावसाळ्यात समाधानकारक हजेरी न लावल्याने उत्पादनात घट होऊन बाजारात झेंडूचा पुरवठा उपलब्ध मागणीच्या तुलनेत कमी पडला आहे. परिणामी झेंडूचा बाजार ऐन दसऱ्याच्या दोन दिवस अगोदरच तेजीत आला आहे.
ऐन झेंडूच्या वाढीच्या हंगामात पावसाने ओढ दिल्याने फुलांच्या गुणवत्तेवर, तसेच उत्पादनावरही परिणाम झाला. बाजारात दाखल होणारा झेंडू काही प्रमाणात कोमेजलेला व आकाराने लहान असल्याचे दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांनी दिवाळी डोळ्यासमोर ठेवून झेंडूची विलंबाने लागवड केली. त्यामुळे त्यांना परतीच्या पावसाचा फायदा झाला व झेंडू चांगल्या प्रमाणात बहरण्यास मदत झाली; मात्र यावेळेस झेंडूचे जे मळे फुलले होते त्या फुलांवर परतीच्या पावसारूपी मोठे संकट कोसळले.
गुरुवारी (दि.२२) विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर फुलबाजारामध्ये पहाटे होणाऱ्या लिलावामध्ये झेंडूची दीडशे-दोनशे रुपये प्रति जाळीप्रमाणे शेतकऱ्यांकडून ठोक विक्री व्यापाऱ्यांना केली जात आहे. घाऊक व्यापाऱ्यांकडून मंगळवारच्या किरकोळ बाजारात सुमारे तीनशे-चारशे रुपये प्रती जाळी याप्रमाणे झेंडू विकला गेला. यामुळे ग्राहकांना ३० ते ३५ रुपये पावशेर या दराने झेंडू खरेदी करावा
लागला. (प्रतिनिधी)