गोदा घाटावर मांसविक्रीवर बंदीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:49 AM2017-08-25T00:49:23+5:302017-08-25T00:49:48+5:30
गोदा घाटावर दर बुधवारी भरणाºया आठवडे बाजारात उघड्यावर मांस-मासळीची विक्री होत असल्याने नदीचे पावित्र्य धोक्यात आले असून, प्रदूषणातही भर पडत आहे. त्यामुळे सदर मांस-मासे विक्रीवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी गोदाप्रेमी नागरी सेवा समितीने निवेदनाद्वारे केली आहे.
नाशिक : गोदा घाटावर दर बुधवारी भरणाºया आठवडे बाजारात उघड्यावर मांस-मासळीची विक्री होत असल्याने नदीचे पावित्र्य धोक्यात आले असून, प्रदूषणातही भर पडत आहे. त्यामुळे सदर मांस-मासे विक्रीवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी गोदाप्रेमी नागरी सेवा समितीने निवेदनाद्वारे केली आहे.
गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गोदावरी संवर्धन कक्षाचे प्रमुख उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, उच्च न्यायालयाने गोदावरी नदीतील जलशुद्धीकरण प्रक्रियेबाबत गंभीर दखल घेत सदर प्रक्रिया होत नसेल तर महापालिकेने त्याबाबत कारवाई करण्याचे आदेशित केलेले आहे. गोदावरी नदीकाठावर प्राचीन रामगया कुंड, खंडोबा कुंड, बाजीराव पेशवे कुंड परिसरात दर बुधवारी आठवडे बाजार भरतो. या बाजारात उघड्यावर मांस व मासे विक्री केली जाते. सदर विक्रेत्यांकडून मांस-मासे नदीपात्रातील पाण्यातच धुतले जातात. त्यामुळे नदीपात्र प्रदूषित होत असते. परिणामी, नदीचे पावित्र्यही धोक्यात येते. याच परिसरात अनेक प्राचीन मंदिरेही असून उघडपणे मांसविक्री होत असल्याने भावना दुखावल्या जातात. सदरची मांस व मासे विक्री तातडीने थांबवावी आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे, अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी समितीचे कार्यकर्ते चिराग गुप्ता, किशोर गरड, नरेंद्र धारणे, अतुल शेवाळे, योगेश रामय्या, मुकेश चोथाणी, रघुनंदन मुठे, अमोल शिंदे आदी उपस्थित होते.