नाशिक मनपाचे १४३७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीवर सादर :

By admin | Published: February 21, 2015 12:57 AM2015-02-21T00:57:57+5:302015-02-21T00:58:20+5:30

घरपट्टी, पाणीपट्टीत दरवाढीची शिफारस

Demand of Nashik Municipal Corporation's budget of Rs.1437 crores on Standing Committee: | नाशिक मनपाचे १४३७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीवर सादर :

नाशिक मनपाचे १४३७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीवर सादर :

Next

 नाशिक : नव्या प्रकल्पांबाबत कोणतीही स्वप्ने न दाखविता महापालिकेचे सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे १४३७ कोटी ६७ लाख रुपयांचे वास्तव आणि वर्षाखेरीस तीन कोटी ५१ लाख रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्थायी समितीला सादर केले. तीन महिन्यांपूर्वी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आपले पहिलेच अंदाजपत्रक सादर करणाऱ्या डॉ. गेडाम यांनी नवीन मिळकतींसाठी रेडिरेकनरनुसार(प्रचलित बाजारमूल्य) करआकारणी, तर पाणीपट्टीत सुमारे ३० टक्के दरवाढ सुचवितानाच औद्योगिक वसाहतीत नव्याने होणाऱ्या कारखान्यांसाठीही करवाढीची शिफारस केली आहे. दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ७४८ कोटी ५६ लाख रुपयांचे स्वतंत्र अंदाजपत्रक लक्षात घेता एकंदर अंदाजपत्रक २१८६ कोटी २३ लाख रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. महापालिकेचे अंदाजपत्रक आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्थायी समितीचे सभापती राहुल ढिकले यांना सादर केले. मागील वर्षी आयुक्त संजय खंदारे यांनी १८७५ कोटी ६९ लाख रुपयांचे अंदाजपत्रक स्थायीला सादर केले होते. त्यात स्थायी समितीने भर घालत ते २९६५ कोटी ६९ लाखांवर नेऊन ठेवले होते, तर महासभेने अंदाजपत्रक ३०४३ कोटी ६९ लाख रुपयांवर नेले होते. परंतु उत्पन्नात झालेली घट पाहता मार्च २०१५ अखेर १०९० कोटी ५५ लाख रुपयांपर्यंत अंदाजपत्रक जाणार असून, ३ कोटी ५१ लाख रुपयांची अखेरीची शिल्लक राहणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. गेडाम यांनी २०१५-१६ चे अंदाजपत्रक सादर केले. १४३७ कोटी ६७ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकात महापालिकेचे स्वत:चे उत्पन्न १२४४ कोटी ७४ लाख रुपये अपेक्षित धरण्यात आले असून, सिंहस्थासह १६ कोटींचे अनुदान मिळणे अपेक्षित आहे. खर्च वजा जाता भांडवली कामांच्या खर्चासाठी केवळ २२९ कोटी ६४ लाख रुपयेच उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे प्रभागातील विकासकामांबाबत नगरसेवकांकडून मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आयुक्तांनी शहरातील जुन्याच मिळकतींवर कोणतीही करवाढ सुचविली नसली तरी १ एप्रिल २०१५ पासून नव्याने विकसित होणाऱ्या मिळकतींवर (औद्योगिक वसाहतींसह) करवाढ सुचविली आहे. पाणीपट्टीतही पहिल्या वर्षी सुमारे ३० टक्के वाढ सुचविण्यात आली आहे. याशिवाय खत प्रकल्प, बहुमजली वाहनतळे, मनपाच्या जागांवर शॉपिंग कॉम्प्लेक्सची उभारणी, फाळके स्मारक, उद्याने आणि वाहतूक बेटे हे बीओटी तत्त्वावर देण्याचा मानस व्यक्त केला आहे.

Web Title: Demand of Nashik Municipal Corporation's budget of Rs.1437 crores on Standing Committee:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.