महापालिका गाळे भाडेवाढीची आकारणी न करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:31 AM2017-07-25T00:31:38+5:302017-07-25T00:31:54+5:30
नाशिकरोड : मनपाच्या भाडेतत्त्वावरील गाळेधारकांनी मार्च २०१७ पर्यंत भाडे भरलेले असल्याने त्यांच्याकडून भाडेवाढ केलेल्या फरकाची आकारणी करू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : मनपाच्या भाडेतत्त्वावरील गाळेधारकांनी मार्च २०१७ पर्यंत भाडे भरलेले असल्याने त्यांच्याकडून भाडेवाढ केलेल्या फरकाची आकारणी करू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. मनपा मालकीच्या गाळेधारकांना मनपाने २०१७ मध्ये गाळ्यांच्या भाड्यात वाढ केल्याचे सांगून ती भाडेवाढ २०१४ पासून लागू केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गाळेधारकांकडे थकबाकी दाखविण्यात येत असून, थकबाकी वसूल करण्यासाठी मनपाकडून गाळे सील करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. याबाबत नाशिक शहरातील मनपाचे भाडेतत्त्वावर घेतलेल्या गाळेधारकांनी सोमवारी मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेऊन मार्च २०१७ अखेरपर्यंत गाळेधारकांनी मनपाकडे भाडे भरलेले आहे. त्यामुळे मनपाने २०१४ पासून लागू केलेली भाडेवाढ जी फरकाची रक्कम आकारणी करू नये. तसेच अवास्तव भाडेवाढ न करता वाजवी भाडेवाढ करावी, अशी मागणी प्रत्येक व्यापाऱ्याने मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा यांना दिलेल्या पत्रात केली आहे. यावेळी सुधीर भट्टड, सोमनाथ झारेकर, वासूशेठ आलठक्कर, हुकूमचंद कोचर, कुलदीप लोकवाणी, किरण झारेकर, दिलीप कोचर, सुनील बेदमुथा, अभय धाडीवाल, पुखराज कोठारी, सुभाष चोपडा आदींंसह शहरातील व्यापारी उपस्थित होते.