पोषण आहारातील त्रुटी दूर करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 06:33 PM2019-07-16T18:33:33+5:302019-07-16T18:33:51+5:30
शालेय पोषण आहारातील त्रुटी दूर करण्यासाठी मुख्याध्यापक संघामार्फत एल्गार आंदोलन उभारण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्याशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्यासाठी जिल्हा मुख्याध्यापक संघाची गुरुवारी (दि. २५) बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी दिली.
सिन्नर : शालेय पोषण आहारातील त्रुटी दूर करण्यासाठी मुख्याध्यापक संघामार्फत एल्गार आंदोलन उभारण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्याशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्यासाठी जिल्हा मुख्याध्यापक संघाची गुरुवारी (दि. २५) बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी दिली.
विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनामध्ये स्थानिक पौष्टिक आहार देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार आता तांदळाच्या खिचडीचे प्रमाण कमी होऊन पौष्टिक असलेल्या ज्वारी, बाजरी व नाचणीचा समावेश केला आहे. आॅक्टोबर महिन्यापासून विद्यार्थ्यांना हा पोषक आहार मिळेल हे जर खरे असले तरी याचा त्रास मुख्याध्यापकांना अगर शिक्षकांना होता कामा नये, अशी मागणी मुख्याध्यापक संघाने केली आहे. आॅनलाइन सर्व कामे या यंत्रणेने पूर्ण करावेत ग्रामीण भागात नेटवर्क नसते अडचणी असतात त्यासाठी अनुदान असावे या सर्व सुविधा खात्रीसह उपलब्ध करून द्या, मगच ही नवीन योजना सुरू करा. अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने दिला आहे. यावेळी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत, कार्याध्यक्ष एस.बी. शिरसाठ, उपाध्यक्ष माणिक मढवई, राजेंद्र सावंत, बी.के. शेवाळे, पुरु षोत्तम रकिबे, परवेझा शेख, शुभलक्ष्मी कुलकर्णी, संगीता बाफना, उल्का कुरणे, एम.व्ही. बच्छाव, बी.डी. गांगुर्डे, बी. एन. देवरे यांनी आव्हान केले आहे.