कांदा निर्यात खुली करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:15 AM2020-12-06T04:15:20+5:302020-12-06T04:15:20+5:30
मानोरी : दिवाळीनंतर उन्हाळ कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण सुरू झाली असून, शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला ...
मानोरी : दिवाळीनंतर उन्हाळ कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण सुरू झाली असून, शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. केंद्र सरकारने तत्काळ कांदा निर्यात खुली करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली जात आहे.
कांद्याच्या दरात काहीशी तेजी आल्यानंतर केंद्र सरकारने १४ सप्टेंबरला अचानकपणे कांद्याची निर्यात बंद करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली होती. वाढलेल्या कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने दुसऱ्या देशातील कांदा आयात केला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा दरवाढीच्या अपेक्षेवर विरजण पडले.
दरम्यान, काही दिवसांपासून लाल कांद्याची आवक सुरू झाली. अनेक शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने चाळीत अद्यापही मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांदा राखून ठेवला आहे. मात्र बाजार समितीत होत असलेली नवीन लाल कांद्याची आवक आणि केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीचा फटका या साठवून ठेवलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे.
कोट
‘भाववाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी अद्यापही मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची साठवणूक केली आहे. पुढच्या काही दिवसांत उन्हाळ कांद्याला समाधानकारक दर न मिळाल्यास कांदे फेकून देण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने तत्काळ कांद्याची निर्यात खुली करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.’
- मच्छिंद्र जाधव, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी युवा संघटना, (पिंपळगाव लेप)