महाराष्ट्र बॅँकेची शाखा सुरू करण्याची मागणी
By admin | Published: December 11, 2015 11:50 PM2015-12-11T23:50:01+5:302015-12-11T23:51:49+5:30
जयदर : खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना ग्रामस्थांचे निवेदन
नाशिक : कळवण तालुक्यातील जयदर परिसरातील सत्तर खेड्यांचे मध्यवर्ती ठिकाण असून, या ठिकाणी बॅँक आॅफ महाराष्ट्रची शाखा सुरू करावी. ही शाखा सुरू झाल्यास परिसरातील हजारो आदिवासी बांधवांची सोय होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी ही शाखा त्वरित सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, या मागणीचे निवेदन जयदर परिसरातील ग्रामस्थांनी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, जयदर व पुनद खोऱ्यातील ७० गावे -खेड्यांचे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथील लोकांना गुरुवारी बाजारासाठी जयदरला यावे लागते. या ठिकाणी मोठी आर्थिक देवाण-घेवाणही होते; मात्र हा व्यवहार करण्यासाठी कनाशी येथे जावे
लागते. कनाशी येथे बॅँकेत व्यवहारासाठी गर्दी होते. परिणामी लोकांचा वेळ वाया जातो. ग्रामस्थांना कनाशी लांब पडत असल्याने आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणात होतो. कनाशी ते जांधाळे हे अंतर ६० किलोमीटर असून, जयदर ते जांधाळ ४० किलोमीटर अंतर आहे. हे अंतर आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे जयदर येथे महाराष्ट्र बॅँकेची शाखा स्थापन केल्यास गरीब आदिवासी जनतेचा पैसा व वेळ वाचणार आहे. त्यामुळे या परिसरातील ७० खेड्यांचा भाग असलेल्या व मध्यवर्ती ठिकाण असलेल्या जयदर येथे बॅँक आॅफ महाराष्ट्रची शाखा सुरू करण्यासाठी शासनस्तरावरून लवकरात लवकर प्रयत्न करावे, असे निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी सरपंच पोपट जगताप, सरपंच सोमनाथ चौरे, शिवराम खांडवी, रघुनाथ महाजन, विश्वास ठाकरे, उत्तम भोये, गोविंद बागुल, रमेश पवार, शिवराम पवार, शिवराम ठाकरे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)