वाहनमालकाकडून खंडणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:37 AM2019-03-28T00:37:29+5:302019-03-28T00:37:47+5:30
स्वमालकीचे चारचाकी वाहन चालविण्यासाठी विश्वासाने दिले. मालकाने त्याचे वाहन पुन्हा चालकाकडून मागितले असता त्यास धमकावून ५० हजार रुपये खंडणीची मागणी केल्याप्रकरणी संशयित सनी अरुण पगारेविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात खंंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदिरानगर : स्वमालकीचे चारचाकी वाहन चालविण्यासाठी विश्वासाने दिले. मालकाने त्याचे वाहन पुन्हा चालकाकडून मागितले असता त्यास धमकावून ५० हजार रुपये खंडणीची मागणी केल्याप्रकरणी संशयित सनी अरुण पगारेविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात खंंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हमीद इम्रान पठाण (५७,रा. वडाळा) यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अलका वाल्मीक आव्हाड यांच्या मालकीची तवेरा कार (एमएच २० सीएच ४६४५) १५ जानेवारी २०१८ रोजी विकत घेतली. सदर वाहन अद्यापही त्यांच्या नावावर झालेले नाही. काही दिवस त्यांचा मुलगा इम्रान यांनी सदर वाहन चालविले, त्यानंतर त्याच्या ओळखीच्या पगारे याला (रा. गोसावी वाडी) विश्वासाने तवेरा हे वाहन चालविण्यासाठी दिले. त्यानंतर काही दिवसांनी तवेरा पगारेकडून पुन्हा मागितली; मात्र पगारे याने वाहन देण्यापासून नकार देत पठाण यांच्याकडे पन्नास हजार रु पयांची मागणी करून जोपर्यंत पैसे देत नाही, तोपर्यंत वाहन मिळणार नाही, असे सांगत एका कोऱ्या कागदावर त्यांनी सही घेण्याचा प्रयत्न केला असता, पठाण हे घटनास्थळावरून पळून आले. पगारे विरु द्ध खंडणी मागितल्या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.