पाण्याची गळती रोखण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:10 AM2020-12-09T04:10:54+5:302020-12-09T04:10:54+5:30
----- चंदनपुरीत गोंधळाच्या कार्यक्रमांना गर्दी मालेगाव : उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्री खंडोबा महाराजांच्या चंदनपुरीत भाविकांची गर्दी होत आहे. ...
-----
चंदनपुरीत गोंधळाच्या कार्यक्रमांना गर्दी
मालेगाव : उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्री खंडोबा महाराजांच्या चंदनपुरीत भाविकांची गर्दी होत आहे. सध्या लग्नसराईची धामधूम सुरू झाली आहे. यामुळे गोंधळाचे कार्यक्रम व दिवट्या-बुधल्या करण्यासाठी भाविक चंदनपुरीत दाखल होत आहेत. परिणामी चंदनपुरीतील आर्थिक उलाढाल वाढली आहे.
-----
माळमाथा भागात विजेचा लपंडाव
मालेगाव : तालुक्यातील माळमाथा भागात वीज वितरण कंपनीकडून भारनियमन केले जात आहे. विजेच्या लपंडावामुळे रब्बी पिकांसह लागवडीस अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्या शेती शिवारातील विहिरींना मुबलक पाणी आहे. मात्र विजेअभावी पिकांना पाणी देता येत नाही. शेतकऱ्यांची कोंडी होत आहे.
-----
मालेगावी सर्रास गुटखा विक्री
मालेगाव : शहर व तालुक्यात सर्रास गुटखा विक्री केली जात आहे. राज्यात गुटखाबंदी असताना मालेगावी सर्रास पान दुकानांवर गुटखा विक्री केली जात आहे. याकडे पोलीस व अन्न व औषध प्रशासन विभागाने सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले आहे. गुटखा विकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
-----
दहीकुटेत पाणी सोडण्याची मागणी
मालेगाव : तालुक्यातील दहीकुटे धरण पावाळ्यात १०० टक्के भरले होते; मात्र सद्य:स्थितीत धरणातील जलसाठा कमी झाला आहे. मोसममाळ कालवा व खडकी बंधाऱ्यातून दहीकुटे धरणात पाणी सोडल्यास जलसाठ्यात वाढ होणार आहे. परिणामी उन्हाळ्यात पाण्याची टंचाई या भागाला जाणवणार नाही. पाटबंधारे विभागाने धरण पूर्णक्षमतेने भरून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
-----
पेट्रोलच्या दरवाढीमुळे वाहनधारक त्रस्त
मालेगाव : पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. शहरात पेट्रोलचे दर ९०.८८ रुपयांवर गेले आहेत. दोन वर्षानंतर पुन्हा एकदा दरवाढ झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्याने इतर वस्तूंच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. पेट्रोल दरवाढीचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसला आहे.
----
नुकसानग्रस्तांना भरपाईची मागणी
मालेगाव : शहरालगतच्या द्याने भागात आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संसारोपयोगी साहित्यासह कागदपत्रे जळून खाक झाले आहेत. या कुटुंबांना शासकीय मदत देऊन नवीन कागदपत्रे तयार करून द्यावी, अशी मागणी मालेगाव आवामी पार्टीचे अध्यक्ष रिजवान बॅटरीवाला यांनी प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
-----
शांतता समिती होणार नव्याने गठित
मालेगाव : शहर शांतता समिती व मोहल्ला कमिटी नव्याने गठित करण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यांकडून स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तींची माहिती संकलित केली जात आहे. गुन्हे दाखल असलेल्या सदस्यांना समितीतून वगळण्यात येणार आहे. सण, उत्सव व तणावग्रस्त परिस्थितीत शांतता समितीचे सदस्य जनतेशी व प्रशासनात समन्वय साधण्याचे काम करणार आहेत.
-----
सुकामेव्याला वाढती मागणी
मालेगाव : शहर व परिसरात थंडीचे प्रमाण वाढले आहे. परिणामी बाजारपेठेत सुकामेव्याला मागणी वाढली आहे. हिवाळ्यात पोषक आहार म्हणून सुकामेवा खरेदी केला जात असतो. मेथीचे लाडू बनविण्यााठीदेखील सुक्यामेव्याचा वापर केला जातो. सुक्यामेव्याच्या किमतीत वाढ झाली आहे.
-----
गटारी साफसफाईची मागणी
मालेगाव : शहरातील गटारी तुडुंब भरल्या आहेत. गटारींचे सांडपाणी रस्त्यांवर येत आहेत. महापालिकेने माेठ्या नाल्यांबरोबरच लहान गटारींची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून केवळ चौकांमधील गटारींची स्वच्छता केली जात आहे.