पावसाळी गटार योजनेच्या फेरचौकशीची मागणी
By admin | Published: June 20, 2017 01:19 AM2017-06-20T01:19:41+5:302017-06-20T01:19:57+5:30
महासभा : पावसाळीपूर्व कामांबाबत शंका
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गेल्या बुधवारी (दि.१४) झालेल्या अतिवृष्टीनंतर शहर जलमय होण्यास पावसाळी गटार योजनेतील त्रुटीच कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत या योजनेची फेरचौकशी करण्याची मागणी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी महापालिकेच्या महासभेत केली. याचवेळी, पावसाळीपूर्व कामांबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित करून प्रशासनाला जाब विचारण्यात आला.
महापालिकेच्या महासभेत दि. १४ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर शहरात उद्भवलेल्या परिस्थितीचे जोरदार पडसाद उमटले. विरोधकांनी मांडलेल्या लक्षवेधीवर सुमारे चार तास चर्चा झाली. यावेळी कॉँग्रेसचे गटनेता शाहू खैरे यांनी पावसाळी, भूमिगत गटार योजना सदोष असल्यानेच शहरातील बाजारपेठांमध्ये पाणी घुसल्याचे सांगत नालेसफाई झालीच नसल्याचा दावा केला. विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी पावसाने प्रशासनाचे पितळ उघडे पडल्याचे सांगत पावसाळी गटार योजनेची खोलात जाऊन चौकशी होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.