मालेगावी एचआरसीटी चाचणीचे दर कमी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:14 AM2021-03-31T04:14:46+5:302021-03-31T04:14:46+5:30
मालेगाव शहर व तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. मागील वर्षभर टाळेबंदीमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत आला. त्यात ...
मालेगाव शहर व तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. मागील वर्षभर टाळेबंदीमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत आला. त्यात कोविडची लक्षणे असल्यास खाजगी दवाखाने एचआर सीटी चाचणी करण्याचा सल्ला देत आहेत. मालेगाव शहरात सदर चाचणी करणारी मोजकीच केंद्र आहेत. त्याचा दर प्रति व्यक्ती २५०० रुपये आहे. तीच चाचणी मालेगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अवघ्या ५०० रुपये दरात होते. खाजगी केंद्रामध्ये सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा दरात चाचण्या कराव्यात. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिक याचा लाभ घेऊ शकतील. परिणामी, कोविड पेशंटची संख्या आटोक्यात येऊ शकते. दरम्यान स्वॅबचा अहवाल येण्यास तीन ते चार दिवस लागतात. परिणामी, संभावित बाधित पेशंटचा अहवाल येईपर्यंत उपचार होत नाहीत. त्यात त्याची प्रकृती ढासळते आणि तो इतरांना ही बाधित करतो. त्यामुळे स्वॅबचा अहवाल लवकर मिळावा, शहरातील सहारा कोविड सेंटरमध्ये पेशंटला रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत नसून त्यांना बाहेरून आणावे लागत आहे आणि सदर इंजेक्शन चढ्या भावाने मिळत आहे. महापलिका क्षेत्रातील रुग्णांसाठी सीसीसी सेंटर चालू करावे, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची भरती स्थगित केली आहे, सदर भरती करण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. याप्रसंगी युवक महानगर अध्यक्ष दिनेश ठाकरे, भगवान माळी, सागर पाटील, कुणाल कदम, राजेंद्र पाटील, शोएब अहमद, नोमान मोहिद्दीन, अनिल पाटील, नीलेश पाटील आदी उपस्थित होते.