किकवारी तलाठ्याची चौकशीची मागणी
By admin | Published: November 27, 2015 11:57 PM2015-11-27T23:57:37+5:302015-11-27T23:58:50+5:30
किकवारी तलाठ्याची चौकशीची मागणी
मालेगाव : बागलाण तालुक्यातील किकवारी (खु) येथील तलाठी मनमानी करत असून, हेतुपुरस्सर खोट्या केस करून त्रास देत असल्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राज्य लोकायुक्तांकडे निवेदनाद्वारे दाजी नामदेव काकुळते या शेतकऱ्याने केली आहे.
निवेदनात किकवारी खु. येथे गट नं. १५० ही स्वत:ची शेती अनेक वर्षांपासून कसत आहे. या शेतीत संबंधित तलाठ्याने काहीही कारण नसताना १४ नंबर पीक पाहणी केस लावून दोन वेळा चालवून मानसिक व आर्थिक त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या केसमध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांनी काकुळते यांच्या बाजूने निकाल दिला आहे. तरीही पुन्हा तलाठी केस करून त्रास देत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सदर तलाठ्याने खोट्या नोदी केल्याचा उल्लेख निवेदनात आहे. यात गट नं. ८७ वर विहीर, तर १४८ नंबरवर डाळींबबागा दाखविल्याचा आरोप काकुळते यांनी केला आहे. संबंधित तलाठ्याविरोधात माहिती अधिकार प्रकरणाची चौकशी दीड वर्षापासून प्रलंबित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदर तलाठ्याची चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी व आपल्यावरील अन्याय दूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)