भोजापूर धरणाचे आवर्तन सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:14 AM2021-05-11T04:14:43+5:302021-05-11T04:14:43+5:30
नांदूरशिंगोटे : भोजापूर धरणाच्या लाभक्षेत्रातील गावांना उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. सिन्नर तालुक्यातील मानोरी, कणकोरी, निऱ्हाळे परिसरातील पाझर तलावात ...
नांदूरशिंगोटे : भोजापूर धरणाच्या लाभक्षेत्रातील गावांना उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. सिन्नर तालुक्यातील मानोरी, कणकोरी, निऱ्हाळे परिसरातील पाझर तलावात धरणातून सुरू असलेले उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी सरपंच योगिता रामनाथ सांगळे यांनी केली आहे.
भोजापूर धरणातून सोमवार (दि. ३) रोजी सिन्नर व संगमनेर तालुक्यांतील गावांतील बंधारे व पाझर तलाव भरण्यासाठी उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. मात्र, आठ दिवस होऊनही कणकोरी परिसरात भोजापूरचे पाणी न पोहोचल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. परिसरातील विहिरींतील पाण्याची पातळी खालवली असून पाझर तलाव, केटीवेअर, बंधारे, सिमेंट बंधारे आदी कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाई जाणवू लागली आहे. दरवर्षी भोजापूर धरणाचे आवर्तन सोडण्याचे निवेदन घेण्यासाठी या गावांचा वापर केला जातो. मात्र, प्रत्यक्षात आवर्तनाचे पाणी शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नसल्याचा आरोप सांगळे यांनी केला आहे.
-----------------------------
पाणीटंचाईने नागरिक हैराण
गेल्या वर्षी भोजापूर धरण भरण्याअगोदरच परिसरातील बंधारे पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली नव्हती. मात्र, यावर्षी शेवटच्या टप्प्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याने आवर्तनाची मागणी करण्यात आली होती. परंतु, या भागात वेळेवर पाणी पोहोचत नसल्याने नाराजी आहेत. रब्बी हंगामातही नेहमीच असाच अनुभव येत असल्याने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून मानोरी, कणकोरी व निऱ्हाळे परिसरातील पाझर तलाव लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने भरून देण्यात यावे, अशी मागणी सरपंच सांगळे यांनी केली आहे.