चणकापूर उजव्या कालव्याला पूर पाणी सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:18 AM2021-08-24T04:18:30+5:302021-08-24T04:18:30+5:30
तीन आठवड्यांपूर्वी चणकापूर उजव्या कालव्याला पूर पाणी सोडण्यात आले होते; परंतु कालव्यातून मोठ्या प्रमाणात होणारी पाणीचोरी व पाणी गळतीमुळे ...
तीन आठवड्यांपूर्वी चणकापूर उजव्या कालव्याला पूर पाणी सोडण्यात आले होते; परंतु कालव्यातून मोठ्या प्रमाणात होणारी पाणीचोरी व पाणी गळतीमुळे कालव्याचे पाणी किशोर सागर धरणापर्यंत पोहोचलेच नाही. यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला होता.
देवळा तालुक्यात चणकापूर उजव्या कालव्यालगत असलेल्या लाभ क्षेत्रातील गावांमध्ये विहिरींनी तळ गाठला आहे. नुकत्याच झालेल्या रिमझिम पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले असले तरी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे आगामी काळात कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागेल.
चणकापूर धरण क्षेत्रात नुकत्याच झालेल्या पावसामुळे जनतेच्या आशा पालवल्या असून कालव्याला पूर पाणी सोडण्याची सर्वांना प्रतीक्षा आहे.
परिसरातील सर्व विहिरींनी तळ गाठल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडण्यासाठी दरवर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागत आहे. चणकापूर उजव्या कालव्याला निश्चित आवर्तन नसल्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांचे पाण्याचे वेळापत्रक कोलमडते, पिकांचे नियोजन करता येत नाही, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे.
देवळा तालुक्याच्या पूर्व भागात अत्यल्प पाऊस झाला असल्यामुळे या भागातील पाझर तलाव, धरणे, साठवण बंधारे, कोरडेच आहेत. पूर्व भागात आताच पाणीटंचाई जाणवत आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळगाव, वाखारी, दहिवड, मेशी, सुभाषनगर, वाखारवाडी, खुंटेवाडी, उमराणा आदी वाढीव कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या गावातील जनता किशोर सागर धरणातून वाढीव कालव्याला पाणी सोडण्याकडे नजर लावून बसली आहे.परंतु किशोर सागर धरणातच अत्यल्प साठा शिल्लक असल्यामुळे पूर्व भागातील जनता वंचित राहण्याची चिन्हे आहेत.
उजव्या कालव्याची कमी वहन क्षमता पाहता रामेश्वर येथील किशोर सागर धरण भरण्यास मोठा कालावधी लागतो. यामुळे किशोर सागर धरणातून पुढे वाढीव उजव्या कालव्याला पाणी सोडण्यास उशीर होतो. त्याचा फटका दरवर्षी तालुक्याच्या पूर्व भागाला बसतो. कारण पूर्व भागातील कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या गावांची तहान भागेपर्यंत पावसाळा संपून जातो व कालव्याचे पाणी बंद होते. असा दर वर्षाचा अनुभव आहे. आमदार डॉ. राहुल आहेर यांनी चणकापूर येथे म्हशाड नाल्याचे पाणी कालव्यात वळविण्याबाबत दिलेले आश्वासन पूर्ण करावे. तसेच चणकापूर ते रामेश्वरपर्यंत उजव्या कालव्याचे विस्तारीकरण लवकर करण्यात यावे अशी जनतेची मागणी आहे.
(२३ देवळा वॉटर)
देवळा तालुक्यासाठी वरदान असलेले किशोर सागर धरण.
230821\23nsk_17_23082021_13.jpg
देवळा तालुक्यासाठी वरदान असलेले किशोर सागर धरण.