सुळे डाव्या कालव्याचे पाणी सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 12:40 AM2018-11-05T00:40:12+5:302018-11-05T00:40:28+5:30
सुळे डाव्या कालव्याचे रब्बी हंगामासाठी आवर्तन ठरविण्यासाठी विसापूर येथे आयोजित पाणी परिषदेत कालव्याचे पाणी खामखेड्यासाठी सोडण्यात यावे तसेच खामखेडा व सावकी येथील पाझर तलावासाठी गेट टाकण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
खामखेडा : सुळे डाव्या कालव्याचे रब्बी हंगामासाठी आवर्तन ठरविण्यासाठी विसापूर येथे आयोजित पाणी परिषदेत कालव्याचे पाणी खामखेड्यासाठी सोडण्यात यावे तसेच खामखेडा व सावकी येथील पाझर तलावासाठी गेट टाकण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. चालू वर्षी तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती असल्याने रब्बी हंगामात सुळे डाव्या कालव्याचे तीन आवर्तन ठरविण्यासाठी सावकी, खामखेडा, पिळकोस, विसापूर, भादवन, बिजोरे, घनगरपाडा आदी भागातील शेतकऱ्यांनी आमदार जे. पी. गावित यांच्या अध्यक्षतेखाली विसापूर येथे सुळे डावा कालवा पाणी आरक्षण परिषदेचे आयोजन केले होते. दरवर्षी उन्हाळ्यात सुळे डाव्या कालव्यास रब्बी हंगामासाठी पिळकोस गावाच्या शिवापर्यंत पाणी सोडण्यात येते, तेव्हा हे पाणी पुढे खामखेडा-सावकी शिवारापर्यंत सोडण्यात यावे तसेच या काळव्याखाली खामखेडा व सावकी पाझर तलावसमोरील कालव्यास गेट टाकण्यात यावे अशी मागणी खामखेडा येथील शेतकºयांनी पाणी परिषदेत केली. खामखेडा व सावकी शिवारातील कालव्यास पाझर तलावाच्या नाल्यावर गेट टाकल्यास पावसाळ्यात या कालव्यास पाणी सोडल्यास पूरपाण्याने हे तलाव भरल्यास भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. सुळे डाव्या कालव्याच्या पाझर तलावासमोरील नाल्यावर गेट टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी उपसरपंच बापू शेवाळे, ग्रामपंचायत सदस्य संजय मोरे, माजी सरपंच संतोष मोरे, दादाजी बोरसे, संजय बच्छाव, दीपक मोरे, साहेबराव शेवाळे, रमेश शेवाळे, भिका शेवाळे आदी शेतकरी उपस्थित होते.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत
चालू वर्षी अल्पपावसामुळे दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. आताच शिवारातील विहिरींनी तळ गाठला आहे. पाण्याअभावी लागवड केलेली पिके सोडून देण्याची वेळ अनेक शेतकºयांवर आली आहे. विहिरींना पाणी नसल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा सुळे डाव्या कालव्याचे पाणी खामखेडा व सावकी शिवारापर्यंत सोडल्यास थोड्याफार प्रमाणात पाणी मुरून विहिरींना पाणी उतरून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.