भोजापूर धरणातून उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:14 AM2021-04-10T04:14:08+5:302021-04-10T04:14:08+5:30
भोजापूर धरणात आजमितीस ४० टक्के म्हणजे १४० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन वर्षांपासून परिसरात पावसाचे प्रमाण जास्त ...
भोजापूर धरणात आजमितीस ४० टक्के म्हणजे १४० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन वर्षांपासून परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने बळीराजा सुखावला होता. परंतु दोन वर्षांच्या काळात अतिवृष्टी, बेमोसमी पाऊस, विविध रोगांचे संक्रमण तसेच पिकांना कवडीमोल भाव यामुळे पाण्याची उपलब्धता असूनही शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागले होते. यावर्षी भोजापूर धरण भरण्याच्या अगोदरच परिसरातील सर्व बंधारे, पाझरतलाव, केटीवेअर, गावतळे, विहिरी पूर्णपूणे भरली होती, त्यामुळे गतवर्षी पाण्याची अडचण आली नव्हती. भोजापूर धरणातून रब्बी हंगामातील पहिले आवर्तन १० फेब्रुवारीला सोडण्यात आले होते. सोडलेल्या आवर्तनातून दोन्ही तालुक्यातील एक हजारच्या आसपास हेक्टरवरील सिंचनाचा लाभ झाला होता. सुमारे वीस दिवस आवर्तन सुरू होते.
मार्च महिन्याच्या मध्यंतरी परिसरातील विहिरींनी तळ गाठल्याने वाडीवस्त्यांवर तसेच शेतशिवारात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे परिसरातील पाझर तलावात भोजापूर धरणातून उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
चौकट-
जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात पाण्याची पातळी चांगल्या प्रमाणात असल्याने रब्बी हंगामात पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून मागणी नव्हती. परंतु गेल्या महिन्यात परिसरात पाणी टंचाई जाणवू लागल्याने बंधारे कोरडेठाक पडल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी लक्ष घालून धरणातून उन्हाळी आवर्तन सोडावे.
- नागेश शेळके, शेतकरी.