बोकटे यात्रेला पालखेडचे पाणी सोडण्याची मागणी
By admin | Published: April 11, 2017 12:21 AM2017-04-11T00:21:05+5:302017-04-11T00:21:23+5:30
बोकटे यात्रेला पालखेडचेपाणी सोडण्याची मागणी
येवला : येथील ग्रामदैवत कालभैरवनाथाच्या यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी पालखेड डावा कालव्याच्या आवर्तनाने पाणी देण्याची मागणी बोकटेसह सात गावांतील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता पालखेड डावा कालवा यांच्यासह संबधितांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागणी मान्य न झाल्यास येवला तहसील कार्यालयावर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यंदा परिसरातील पाण्याचे स्रोत पूर्णपणे संपुष्टात आले आहे. त्यामुळे मंगळवार ११ एप्रिलपर्यंत पाणी सोडण्याची जोरदार मागणी पंचक्रोशीतील सात गावांतील ग्रामस्थांसह सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे.
पाणी न सोडल्यास १२ एप्रिलपासून येवला तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर मविप्र संचालक अंबादास बनकर, राष्ट्रवादीचे नेते अॅड माणकिराव शिंदे, शिवसेना नेते संभाजी पवार, जिल्हा बँकेचे संचालक किशोर दराडे, माजी जि.प. अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, जि.प. सदस्य महेंद्र काले, कृउबा माजी सभापती अरु ण काळे, प.स.माजी सभापती रामदास काळे, हरिभाऊ जगताप, किसनराव धनगे, गणपतराव देशमुख, प्रताप दाभाडे, सखाहरी लासुरे यांसह ४०० ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)