पिंपळगाव टोलनाक्यावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 04:22 PM2018-12-14T16:22:40+5:302018-12-14T16:23:00+5:30
शेतकऱ्यांचे निवेदन : कार्यवाहीचे आश्वासन
कोकणगाव : पिंपळगाव टोल नाक्याजवळ अनधिकृतपणे विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लागले जात असल्याने वाहतुकीच्या कोंडीत भर पडण्याबरोबरच शेजारील शेतक-यांच्या द्राक्षबागांचे नुकसान होत असल्याची तक्रार स्थानिक शेतक-यांनी टोल प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, टोलनाक्या शेजारी चहाच्या गाड्यांसह खाद्यपदार्थांचे स्टॉल लागत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. त्याचा त्रास आजूबाजूच्या शेतक-यांना होतो. याचबरोबर शेजारील शेतक-यांच्या द्राक्षबागेचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जाते. तार कंपाउंड तोडून द्राक्ष बागेचे नुकसान केले जाते. गाड्या उभ्या करून दारु च्या बाटल्या व प्लॅस्टिकच्या बाटल्या व ग्लास मोठ्या प्रमाणात टाकले जातात. त्याचा शेतीवर परिणाम होत असतो. याशिवाय परिसरात अवैध व्यवसायही चालतात. त्यांना समजावण्यास गेले असता त्यांच्याकडून स्थानिक शेतक-यांना दमदाटी केली जाते. बºयाचदा शेताच्या बांधावर नैसर्गिक विधीही पार पाडले जातात. सदर स्टॉल व गाडे बंद करावे अशी मागणी करण्यात आली. सदर मागण्यांचे निवेदन महामार्ग प्राधिकरणचे खोडसकर यांच्याबरोबरच टोल मॅनेजर चौधरी यांनाही देण्यात आले. यावेळी चौधरी यांनी वरिष्ठांशी चर्चा करुन कार्यवाहीचे आश्वासन दिले.